Mon, Jun 17, 2019 19:19होमपेज › Pune › दूध अनुदान निर्णयाची योग्य अंमलबजावणी करावी : राजू शेट्टी 

दूध अनुदान निर्णयाची योग्य अंमलबजावणी करावी : राजू शेट्टी 

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:55AMपुणे ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांना गायीच्या दुधाला लिटरला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय नागपूर येथे सर्वमान्य झाला असून त्यांची अंमलबजावणी सर्वांनी करावी. त्यापासून कोणी बाजूला गेल्यास दुधातील आम्हांला सर्व माहिती आहे. ते हळूहळू आम्ही बाहेर काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे दिला. दुधाचे अनुदान मिळवताना अधिकार्‍यांना टक्केवारी द्यायला लागू नये, अशी भीती डेअरीचालकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना सरकारने टक्केवारी द्यायला लागू नये याची काळजी आधीच घ्यावी.  अन्यथा त्यांची नावे सांगा. आम्ही ते बघून घेऊ, असेही स्पष्ट केले.

सरकारने शेतकर्‍यांना गायीच्या दुधासाठी थेट पाच रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर खा. शेट्टी यांनी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली आणि पुढच्या आंदोलनास असेच यश देण्याची प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली. दूध दरवाढीच्या ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी दूध संघांनी करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये कुचराई केल्यास गणपती सणावेळी दूध मिळणार नाही, अशी व्यवस्था स्वाभिमानी संघटना करेल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर, अ‍ॅड योगेश पांडे, पृथ्वीराज जाचक, राजेंद्र ढवाण-पाटील, पांडुरंग काळे आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीस डेअरी मालक, चालक नागपूर येथे उपस्थित होते. त्यांच्या संमतीनेच हा प्रस्ताव तयार झाला आणि विधानसभेत घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनुदानासाठी अधिकार्‍यांनी दुधाच्या विषयात तोंड घालू नये, यासाठी सरकारने लक्ष घालावे, असेही ते म्हणाले.

उसाच्या एफआरपी वाढीत शेतकर्‍यांचे नुकसान

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीच्या मूलभूत सुत्रात बदल करत साडेनऊ टक्क्यांऐवजी तो दहा टक्के केला. 2,550 वरुन भाव 200 रुपयांनी वाढवून 2,750 केला. मात्र, अर्धा टक्‍का वाढवून दुसर्‍या हाताने 145 रुपये शेतकर्‍यांच्या खिशातून काढून केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वासघात केल्याचा आरोप करून खा. शेट्टी यांनी केला. संसदेतील अविश्‍वास ठरावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गळाभेट घेतल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, राहुल गांधी मिठी मारली अथवा अन्य काही केले तरी 2019 च्या निवडणुकीमध्ये शेतकरी औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नाहीत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाचे हमीभाव देण्यातही सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले.