Mon, Jun 17, 2019 04:56होमपेज › Pune › महापालिका क्षेत्रात आठवडाभर प्रचाराचा धडाका

महापालिका क्षेत्रात आठवडाभर प्रचाराचा धडाका

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 11:08PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा आठवडा उरला आहे. त्यामुळे आता आठवड्याभरात भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी दोन्ही पक्षांचे माजी मंत्री, प्रदेशाध्यक्षांची फौज सांगलीकडे धावणार आहे. या सर्वांच्या तोफांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी तसेच अपक्षांच्या महाआघाडीने महापालिका निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. यानुसार दि. 1 ऑगस्टरोजी होणार्‍या प्रचारासाठी आता शेवटचा आठवडा उरला आहे. त्यासाठी आपापल्या पक्षांकडून प्रचारासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे. त्यानुसार भागाभागात पदयात्रा,बैठका, जाहीर  सभांचा धडाका सुरू आहे. 

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले,  मुख्यमंत्री फडणवीस यांची  दि.28 जुलैला सांगली आणि मिरजेत सभा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी (दि.24 जुलै)  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,  दि.26 ते 30 जुलैस पालकमंत्री सुभाष देशमुख हे तीनही शहरात प्रचारासाठी येणार आहे. संपर्कदौरा, प्रचारफेरी, सभा होणार आहेत.  महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या दि. 27 जुलैरोजी रोजी सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये बैठका, सभा घेणार आहेत. ते म्हणाले, माझ्याबरोबर खासदार संजय पाटील,आमदार सुरेश खाडे,नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचारात सहभागी आहेत. दरम्यान, सात अपक्ष उमेदवारांनी आज भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले. 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रचारात 

या आठवड्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण,  आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदि अनेक नेते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी येणार  आहेत. सोमवारी (दि. 23) शिवसेनेचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री  एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभा होणार आहेत. तसेच अन्य पक्षांकडून स्थानिक नेते तसेच राज्यपातळीवरील नेते प्रचारासाठी  येणार आहेत.