पिंपरी : प्रतिनिधी
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्यास सोमवार (दि.7) पासून सुरुवात होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईट सुरू होण्यास आणखी कालावधी लागत असल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याचे परिपत्रक तातडीने रद्द केले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी तयारी सुरू आहे. शहरातील झोननिहाय केंद्रातून सर्व शाळांना महितीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांकडून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका दिल्या जात आहेत. प्रवेशाचा पहिला भाग भरण्यासाठी काही तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे.