Mon, Apr 22, 2019 16:33होमपेज › Pune › पुणे शहर देशातील शिक्षणाचा केंद्रबिंदू

पुणे शहर देशातील शिक्षणाचा केंद्रबिंदू

Published On: May 30 2018 4:44PM | Last Updated: May 30 2018 4:44PMपुणे : प्रतिनिधी 

देशाच्या शैक्षणिक इतिहासात पुण्याचे योगदान मौल्यवान आहे. पुणे शहर हे शैक्षणिक क्षेत्रात कायमच देशाच्या आणि राज्याच्या  केंद्रस्थानी राहिले आहे.  या शहरातून नेहमीच पुरोगामी विचारसरणीचा प्रसार होतो. आधुनिक भारताच्या जडण-घडणीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांमध्ये फक्त पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी चांगले संस्कार रुजविणे गरजेचे आहे. आधुनिक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी याच पुणे शहरात घातला. पुणे शहराचा शैक्षणिक वारसा हा येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती   कोविंद म्हणाले,  शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर ज्ञानाबरोबर मूल्यवर्धित आयुष्य जगण्याची कला शिकवतात. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणामुळे तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होते. शिक्षकांनी दिलेले ज्ञानच विद्यार्थ्याची खरी ओळख असते. साधू वासवानी शाळेतून देशसेवेसाठी चांगले नागरिक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लालकृष्ण अडवाणी यांनी शुभेच्छापर भाषणात येथे येऊन आनंद झाल्याचे सांगितले. तर जावडेकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित होणे अपेक्षित असताना त्यांच्यात गुणांची टक्केवारी यामध्ये निर्माण झालेली स्पर्धा चिंताजनक आहे. विद्यार्थी आज मैदानात खेळायला जात नाहीत. आपल्या  अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली विद्यार्थी राहू नयेत म्हणून लवकरच नवीन शिक्षण पद्धती आणण्यात येईल याबाबत अनेक सूचना मागविण्यात आल्या असून, लवकरच तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेे ते म्हणाले.दादा जे. पी. वासवानी यांनी आपल्या भाषणात शाळा स्थापनेचा उद्देश सांगितला. नवीन शिक्षण पद्धतीमुळे मानवतेचा विकास होण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक साधू वासवानी मिशनच्या गुलशन गिडवानी यांनी केले. आभार शाळेच्या प्राचार्या आरती पाटील यांनी मानले.