Thu, Nov 15, 2018 06:20होमपेज › Pune › जैविक कचर्‍यापासून द्रवरूप खताची निर्मिती

जैविक कचर्‍यापासून द्रवरूप खताची निर्मिती

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी 

औरंगाबाद ते पुणे-मुंबईपर्यंत कचर्‍याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केलेले असताना त्यावरील उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी चैताली पोपट क्षीरसागर व तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी केले आहे. हा उपाय आहे- जैविक कचर्‍यापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती. विशेष म्हणजे हे संशोधन राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत सादर झाले आणि त्याला राष्ट्रीय पातळीवरील दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे.

चैत्राली अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात (एफवाय, बीएस्सी) शिक्षण घेत आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. चैताली ही डॉ. लावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर काम करत आहे. तिच्या संशोधनात जैविक कचर्‍यापासून द्रवरूप खत तयार केले जाते. हे खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. ते द्रवरूप असल्याने वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच, कचर्‍याची समस्यासुद्धा आपोआप निकाली निघत आहे.    

राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय संशोधन, नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा दरवर्षी होत असते. ती याच आठवड्यात हरयाणामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये 15 राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात चैताली तसेच, चहक खजुरिया व शुभान्यू सिंग हे विद्यार्थी विद्यापीठातर्फे सहभागी झाले होते. त्यात चैतालीने कृषी विषयांतर्गत हे सादरीकरण केले. त्यात तिला राष्ट्रीय पातळीवरील दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे फाटा येथील मुकिंदपूर या गावची आहे. तिचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. तिचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. यापूर्वी तिने विज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती या स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून मेन्टॉर म्हणून गेलेले डॉ. शशिकांत गुंजाळ यांनी दिली.

Tags : pune, pune news,Production,  organic manure, biological wastes