Mon, May 27, 2019 01:12होमपेज › Pune › घरफोड्यांचा प्रश्‍न अधिवेशनात 

घरफोड्यांचा प्रश्‍न अधिवेशनात 

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची झोप उडविणार्‍या घरफोड्यांचा प्रश्‍न  आमदार मेधा कुलकर्णी यांनी नागपूर अधिवेशनात लेखी प्रश्‍नाद्वारे उपस्थित केला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांकडून अशा घटनांची तत्काळ दखल घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

शहरातील कोथरूड, प्रभात रोड या भागात 2018 या वर्षाच्या सुरुवातीला   म्हणजे दि. 30 जानेवारी या दिवशी भरदिवसा सात घरे फोडली होती. आमदार मेधा कुलकर्णी राहत असलेल्या शेजारील बंगला चोरट्यांनी फोडला होता. पुण्यातील या  घरफोड्यांच्या गंभीर घटनांसंदर्भात आ. कुलकर्णी यांनी   नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना  लेखी प्रश्‍न विचारला होता.  त्याला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात माहिती दिली आहे. घरफोडींच्या घटनांची पोलिस तत्काळ दखल घेत असून, गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. केवळ पाच महिन्यांमध्ये 28 दरोडे आणि 2 हजार 227 चोरीच्या (मे अखेरपर्यंत) घटना घडल्या आहेत. तर, पुणे ग्रामीणमध्ये 28 दरोडे आणि 2 हजार 232 चोरीचे प्रकार घडले आहेत. या संदर्भात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. 

पोलिसांकडून रात्री गस्त घातली जात असून  सराईत गुन्हेगारांची व वाहनांची तपासणी केली जात आहे. तर, रात्रीच्या गस्तीसाठी ग्रामसुरक्षा दल,  स्थानिक नागरिक यांना गस्तीसाठी प्रोत्साहित केले जाते. चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात धोक्याची सूचना देणारी इलेक्ट्रीक यंत्र बसविणे, सोसायटीला सुरक्षारक्षक नेमणे, अनोळखी व्यक्तीची माहिती पोलिसांना देणे या गोष्टीची माहिती देऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, असे कुलकर्णी यांच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.