Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Pune › स्क्रॅपच्या खुल्या वाहतुकीने वाहनचालक झाले त्रस्त

स्क्रॅपच्या खुल्या वाहतुकीने वाहनचालक झाले त्रस्त

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:40PMपिंपरी : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी अशी आहे. येथे लहान-मोठे  उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. त्या अनुषंगाने कंपन्यांतून निघणार्‍या  स्क्रॅपची वाहतूक खुली केली जात आहे. त्यामुळे वार्‍याने स्क्रॅपमधील बर उडून डोळ्यात जात असल्याने  वाहनचालकांना अपघातास निमंत्रण मिळत आहे. या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन औद्योगिक वसाहती आहेत. लहान-मोठ्या हजारो कंपन्या आहेत. त्याच्यावर आधारितही हजारो व्हेंडर आहेत. प्लॅस्टिक उद्योग सोडल्यास सर्व ठिकाणी स्क्रब निर्माण होते. स्क्रबचा मोठा व्यवसाय शहरात चालतो. या व्यवसायात शहरातील मोठ्या हस्ती अग्रभागी आहेत. रस्त्यावर दररोज शेकडो टन स्क्रबची वाहतूक केली जाते. छोटा हत्तीपासून ते मोठे टेम्पोत ही वाहतूक केली जाते; मात्र बर्‍याच अंशी छोटा हत्ती व इतरत्र वाहनातून खुल्यावरच ती वाहतूक केली जाते. वार्‍यामुळे स्क्रॅपमधील बर, छोटे कण उडून पाठीमागे येणार्‍या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात जातात. त्यामुळे अचानक वेगात असणार्‍या दुचाकीस्वाराचे  नियंत्रण सुटून अपघात होत आहेत.  स्क्रॅपमधून गलेलठ्ठ होणार्‍या या व्यावसायिकांना या घटनांचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.व्यवसाय केला पाहिजे; परंतु त्यापासून इतरांना त्याचा त्रास होता कामा नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे; मात्र तसे न होण्यामुळेच खुल्यावर स्क्रॅपची वाहतुकीमुळे दुचाकीस्वारांच्या अपघातास निमंत्रण मिळत आहे.