Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Pune › आकुर्डी मंडईत समस्याच समस्या

आकुर्डी मंडईत समस्याच समस्या

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 10:39PMपिंपरी : पूनम पाटील

शहरातील पिंपरी, चिंचवडमधील भाजी मंडईप्रमाणेच आकुर्डीतील श्री खंडेराया भाजी मंडईलाही समस्यांनी ग्रासले आहे. दोन वर्षांपूर्वी आकुर्डीतील जुन्या भाजी मंडईचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, अपुर्‍या सोयी सुविधा व गाळ्यांना आकारण्यात येणारे भाडे गाळेधारकांच्या आवाक्याबाहेर आहे. येथे अपुरी प्रकाश व्यवस्था असून स्वच्छतेचा प्रश्‍नही तसाच आहे. त्यामुळे वरकरणी जरी नूतनीकरण करण्यात आले असले तरी समस्यांचा बाजार मात्र तसाच आहे. 

मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. मंडईच्या आतही भाजी विक्रेते वाटेवरच अतिरिक्त भाजीच्या टोपल्या भरुन ठेवतात. त्यामुळे ग्राहकांना भाजी खरेदी करताना त्रास होतो. जवळपास शंभरच्या आसपास भाजी विक्रेते येथे व्यवसाय करतात. तुलनेने गाळ्याचे आकार छोटे आहेत. काही काळापूर्वीच किरकोळ दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. पावसामुळे मंडई गळत असल्याने काही दिवसांपूर्वी पत्रे बसवण्यात आले. मात्र, मंडईत जुने झाड असून या झाडाभोवतालचा भाग पूर्वीसारखाच गळत आहे. ठेकेदार कामाचे पैसे घेऊन गायब झाला असल्याची तक्रार येथील भाजी व्यापार्‍यांनी केली आहे.

दुर्गंधीमुळे नव्या मंडईकडे विक्रेत्यांसह ग्राहकांची पाठ

शेजारीच काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगरसेवकांच्या आग्रहाखातर नवी भाजी मंडई बांधण्यात आली होती. मात्र ती नाल्यावर बांधल्याने दुर्गंधी येत असून अनेकदा नाल्यातून साप मंडईत आले आहेत. त्यामुळे तिकडे ग्राहक फिरकत नसल्याने पूर्वीच्याच जागी व्यापारी भाजी विक्री करत आहेत. यामुळे नवी भाजी मंडई वापराविना पडून असून महापालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडत आहे. मंइर्डत अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली नाही, सुरक्षारक्षकही नाही. त्यामुळे ग्राहकांचे मोबाईल चोरीला जाण्याचेे प्रकार वाढीस लागले  आहेत. त्यामुळे त्वरित सीसीटीव्ही  बसवावे व अन्य प्रश्‍न मार्गी लावावेत, अशी मागणी येथील भाजी विक्रेत्यांनी केली आहे.