होमपेज › Pune › एसटी महामंडळाकडून खासगीकरणाचा घाट...!

एसटी महामंडळाकडून खासगीकरणाचा घाट...!

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

शिवशाहीसारख्या बसेस..., स्वारगेट डेपोचे स्वच्छतेचे कंत्राट..., युनिफॉर्ममध्ये चालवलेले खासगीकरण आतापर्यंत आम्ही सहन केले. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा घाट घालत, एसटी महामंडळातील सरकारी नोकरी सोडून कंत्राट पध्दतीने, ‘पुन्हा रूजू व्हा, तरच पगारवाढ मिळेल’, असा धमकी वजा इशारा दिला आहे. यावरून एसटी महामंडळ खासगीकरणाचा घाट घालत आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. अपेक्षित पगारवाढ न केल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. या पार्श्‍वभुमीवर एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दै.‘पुढारी’च्या कार्यालयात येऊन आपली भूमिका मांडली. यावेळी इंटकचे डेपो सचिव लक्ष्मण सोनावणे, एसटी कामगार संघटनेचे डेपो अध्यक्ष मनोज कोंढरे, एसटी कामगार संघटनेचे डेपो सचिव पुंडलिक शेडगे, कोषाध्यक्ष निलेश पोटफोडे उपस्थित होते.

कोंढरे म्हणाले, पगारवाढ करताना, 3500 हजार ग्रेड पे मध्ये तडजोड करण्याची आमची तयारी असतानाही 3500 रूपयांपैकी आम्हाला काहीही देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे आमच्या वेतन वाढीवर मर्यादा आल्या आहेत. शासनाने एकतर्फी वेतनवाढ केली आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्याचबरोबर 19 ते 20 हजार पगारवाढ हवी असेल, तर सुवर्णसंधीच्या नावाखाली एसटीची सरकारी नोकरी सोडून 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर कंत्राट पध्दतीने पुन्हा रूजू व्हा, असा धमकी वजा इशारा आम्हाला दिला आहे. खरे तर एसटी महामंडळाने सर्वच कामांचे खासगीकरण करायचे ठरविले असल्याचे दिसत आहे. शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार कर्मचार्‍यांना 18 हजार रूपये तरी पगार देण्यात आला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

यावेळी सोनावणे म्हणाले, प्रवासी हे आमचे दैवत आहे. गेली दोन दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासाठी आम्ही दिलगिर आहोत. मात्र, हा बंद घडविण्यात शासनाचाच हात आहे. मागे ऐन दिवाळीत पुकारलेल्या संपावेळी देखील त्यांचाच हात होता. शासनाने जर आमच्या मागण्या वेळेत पूर्ण केल्यातर संप मिटणार आहे. मात्र, शासन यात लक्षच घालत नाही. याऊलट शासन संप चिघळविण्याचा मार्गावर आहे. आमचे अनेक कर्मचारी बडतर्फ करण्यात येत असल्यामुळे संप अधिकच चिघळणार आहे. तसेच हा संप शासनानेच आमच्यावर लादला असल्यासारखे आहे.
पोटफोडे म्हणाले, आता एसटीचा संप आहे, म्हणून सध्या खासगी ट्रॅव्हल्स, खासगी वाहन चालकांची चांदीच होत आहे. मात्र, एसटी सुरू असली, तरी सुध्दा ट्रॅव्हल्स वाल्यांचे अनेक एजंट स्वारगेट स्थानकात येऊन प्रवाशांची पळवा पळवी करतात. प्रवाशाची इच्छा नसली तरी काही ना काही सांगून प्रवाशाला ट्रॅव्हल्सने प्रवास करायला बाग पाडतात. याबाबत पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितले तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. याबाबत सर्वच पातळीवर उदासिनताच दिसून येते.

शेडगे म्हणाले, शासन एसटीच्या उत्पन्नवाढीबाबत विचार करत नाही. उत्पन्न वाया घालविण्याचाच विचार करत आहे. एसटीला हितकारक ठरतील अशा गोष्टी करण्याऐवजी नुसतीच ‘शो’बाजी करत आहे. एसटीच्या आणि कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय शासनाने घ्यावेत, उत्पन्न वाढीचा विचार करावा. असे केल्यास एसटी कर्मचारी नक्कीच शासनाला पाठींचा देतील.