Sat, Sep 22, 2018 06:51



होमपेज › Pune › खासगी विद्यापीठांनीही घ्यावा समाज उभारणीसाठी पुढाकार 

खासगी विद्यापीठांनीही घ्यावा समाज उभारणीसाठी पुढाकार 

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 1:28AM

बुकमार्क करा




पिंपरी : प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर जाऊन लढणे म्हणजेच देशभक्ती नव्हे, ती उच्च प्रतीची राष्ट्रभक्ती आहे, मात्र राष्ट्र बांधणीत सहभाग, राष्ट्र पुढे नेण्यासाठी पुढाकार घेणे हीसुद्धा राष्ट्रभक्ती आहे. म्हणूनच सामाजिक व आर्थिक सुधारणांसाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सिम्बायोसीस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या किवळे येथील सिम्बायोसीस स्किल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, सिम्बायोसीसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसीस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्रो-चॅनसीलर डॉ. स्वाती मुजुमदार, श्रावण कवडेकर आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पारंपरिक खासगी विद्यापीठांपेक्षा कौशल्य विद्यापीठ हा वेगळा प्रयोग आहे. कौशल्य विद्यापीठाची हाताळणी अर्थात नियंत्रण कोणी करायचे याबाबत संभ्रम होता. मानव संसाधन विभागाने नियंत्रण करायचे की, कौशल्य विभागाने? असा तो संभ्रम होता. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी याबाबतचे विधेयक मंजूर केले. कौशल्य विद्यापीठ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे सिम्बायोसीसला त्यांची नक्की भेट घडवून आणू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लोकसंख्येच्या 65 टक्के लोक 35 वर्षांच्या आतील आहेत, त्याचे रूपांतर कौशल्यधारित शिक्षणात झाले तर जागतिक अर्थव्यवस्था म्हणून आपण पुढे येऊ, ही संधी दुर्मिळ आहे. युरोप, कोरिया, चायनासारखी आपल्याला संधी आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यापीठ व कारखानदारी क्षेत्र एकत्र आल्यास प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. केवळ पुस्तकीज्ञान नको तर प्रात्यक्षिक ज्ञानही यशाची गुरुकिल्ली आहे. भारताला कौशल्य विकासाची गरज असून इतर खासगी विद्यापीठांसाठी सिम्बायोसीस आदर्श उदाहरण ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आणखी खासगी विद्यापीठे पुढे आल्यास सरकार त्यांना मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ. स्वाती मुजुमदार यांनी केले. विद्यार्थ्यांची उद्योग क्षेत्रातील भूमिका लक्षात घेऊन व विविध उद्योग समूहांच्या मदतीने अभ्यासक्रम बनवला आहे. परिवर्तनशील शिक्षणाचे विविध मार्ग, क्रेडिट बँकिंग, ट्रान्सफर, मल्टी एंट्री आणि एक्झिट यांमुळे हे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठांपेक्षा निराळे आहे.

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, महाराष्ट्रातील हे पहिले कौशल्य विद्यापीठ आहे. मे 2017 मध्ये सिम्बायोसीस स्किल अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी राज्य विधान मंडळाअंतर्गत अधिनियमित झाले आहे. 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व अभियांत्रिकीच्या पदवी आणि 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे.