Tue, Apr 23, 2019 20:20होमपेज › Pune › शाळा, पालकांमुळे खासगी वाहतूक फोफावणार

शाळा, पालकांमुळे खासगी वाहतूक फोफावणार

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी स्कूलबसेसची फिटनेस चाचणी होणे बंधनकारक आहे. मात्र, आरटीओच्या आवाहनानंतरही शहरातील स्कूलबस चालकांनी पुनर्फिटनेस तपासणीस कोलदांडा दिला आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत शाळा सुरू होणार असल्यामुळे संबंधित शाळा आणि पालकांमुळे असुरक्षित खासगी वाहतूक फोफावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील वर्षांत शहरासह जिल्ह्याभरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची खासगी रिक्षा आणि ओम्नी वाहनातून असुरक्षित वाहतूक करण्यात आली होती. विशेषतः पालकांकडून मुलांना जवळच्या शाळेत पाठविण्यासाठी रिक्षांचा अधिक वापर केला जातो. अनफिट स्कूलबस आणि ओम्नी रस्त्यांवर येणार असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरटीओ, शालेय प्रशासन, पालकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी पालकांचा अट्टहास कायम असतो. मात्र, विद्यार्थी, प्रवास आणि स्कूलबसकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे आढळून आले आहे. शहरातील बहुतांश रिक्षातून 8 ते 10 विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यातच जादा पैसे कमविण्याच्या नादात अनेक रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

अनफिट स्कूलबस आणि रिक्षांची तपासणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, स्कूलबस वाहनांची संख्या काही हजारांवर असल्याने मनुष्यबळाअभावी कारवाईचा बार फुसका निघणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्कूलबसेसची फिटनेस तपासणी न झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घेणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शाळा प्रशासन आणि पालक अनभिज्ञ

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूलबसमध्ये नियमानुसार सोयी-सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी करण्याबाबत शाळा प्रशासन आणि पालक अनभिज्ञ आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनेक पालकांकडून स्कूलबस नियमावलीकडे तडजोड केली जात आहे.