होमपेज › Pune › ‘प्लास्टिकमुक्त’साठी हवा वैयक्तिक सहभाग 

‘प्लास्टिकमुक्त’साठी हवा वैयक्तिक सहभाग 

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:40PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

राज्यातील प्रत्येक नागरिकाने वैयक्तिकस्तरावर प्लास्टिक वापरावर बंदी आणायला हवी. मी प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे.  शासनाला प्लास्टिकमुक्तीच्या निर्णयात साथ देण्यासाठी नागरिकांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे सहा हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये आमदार महेश लांडगे यांनी  पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी वैयक्तिक सहभाग महत्त्वाचा आहे, असे आमदार लांडगे म्हणाले.  

हेमंत गावडे यांनी सुरु केलेल्या उपक्रमाला आमदार  लांडगे यांनी देखील पाठिंबा दर्शविला असून त्यांनी वैयक्तिक स्तरावर मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठविले आहे. प्लास्टिक बंदी करण्याच्या निर्णयात सामान्य नागरिकांची भूमिका त्यांनी आपल्या पोस्टकार्ड मध्ये स्पष्ट केली आहे.

लांडगे यांनी पत्रात म्हटले आहे की, प्लास्टिकचे होत नाही विघटन, त्याचे करू दैनंदिन वापरातून उच्चाटन. प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी घालण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाच्या विचाराधीन असून, या निर्णयाचे स्वागत आहे. हा निर्णय पर्यावरणपूरक आयुष्य देण्याच्या दृष्टीने महत्वाची पायरी ठरणार आहे. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, प्लेट, चमचे, ग्लास व इतर वस्तू मी वापरणार नाही व त्यांना उपलब्ध असणा-या अनेक पर्यायांचा मी व माझे कुटुंब वापर करू. महाराष्ट्र शासन पर्यावरण संवर्धनासाठी जे-जे निर्णय घेईल, त्यास माझा सक्रिय पाठिंबा राहील अशी ग्वाही मी देतो. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना अशा आशयाची पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहेत.

या उपक्रमातून प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी लोकसहभाग वाढवण्यात येणार आहे. लांडगे यांनी  सोमवारी  आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, प्लेट, यांसारख्या वस्तू वापरणार नाही.  पर्यायांचा वापर करणार असल्याची शपथ घेतली.