Mon, Apr 22, 2019 03:47होमपेज › Pune › खासगी बस उलटली 

खासगी बस उलटली 

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 10:45PMपिंपरी : प्रतिनिधी 

चालकाचा ताबा सुटल्याने कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी बस पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बस पलटी होऊन काही अंतर घसरत गेली.  बसमधील 8 प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. ही घटना वाकड येथे मुंबई-बंगळूर महामार्गावर मुळा नदीच्या पुलावर रविवारी (दि.8) पहाटे चारच्या सुमारास घडली.  न्यायाधीश चंद्रशीला सचिन पाटील (वय 30), स्वरा सचिन पाटील (वय 4, दोघी रा. मुंबई) या मायलेकींसह फौजी सचिन फुलवर्ते (26, रा. कोल्हापूर) गंभीर जखमी झाले असून दीपाली जाधव (वय 30), विद्या देवकर (वय 50) स्नेहा भगत (वय 21), विनायक सावंत (वय 32, सर्व रा. मुंबई), केदार भोरके (16 रा. कोल्हापूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी विनायक सावंत यांच्या फिर्यादीवरून बसचालक हारून मुल्ला याच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम. बी. लिंक या खासगी ट्रॅव्हल्सच्या बस बोरीवली ते कोल्हापूर प्रवासी वाहतूक करतात. रविवारी पहाटे बस (एम.एच.09-सी.व्ही.3697) प्रवासी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्यावर उलटली. या बसमध्ये एकूण तीस प्रवासी प्रवास करीत होते. बस कठड्याला धडकून रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी आणि वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बसचा पाटा अचानक तुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती, मात्र या वृत्ताला पोलिसांनी  दुजोरा दिला नाही.  

दैव बलवत्तर म्हणून ..  

दैव बलवत्तर म्हणून बस पुलाच्या कठड्याला धडकून कठड्याच्या विरुद्ध बाजूस पलटी झाली. बसच्या धडकेने पुलाचा कठडा तुटला असता तर बस थेट मुळा नदी पात्रात कोसळून मोठा अनर्थ झाला असता. 27 जानेवारी रोजी कोल्हापूर येथील पंचगंगा नदीत मिनीबस कोसळून पुण्यातील केदारी कुटुंबातील तेरा जणांना जलसमाधी मिळाली होती. वाकडच्या या घटनेमुळे पंचगंगा नदीतील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.