Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Pune › कैद्यांच्या कष्टावर फुलतेय कृषी महाविद्यालयातील शेती

कैद्यांच्या कष्टावर फुलतेय कृषी महाविद्यालयातील शेती

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

येरवडा मध्यवर्ती खुल्या कारागृहात शेती करणारे कैदी पहिल्यांदाच कारागृहाबाहेर जाऊन शेती करू लागले आहेत. खुले कारागृह सोडून कैद्यांनी इतरत्र शेती करण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे. सध्या  30 कैदी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील शेतात काम करत असून, त्या बदल्यात त्यांना मजुरी स्वरूपात प्रतिदिन 201 रुपये मिळत आहेत. दरम्यान, भविष्यात गरजेनुसार कैद्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. 

जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या, वर्तणूक चांगली असलेल्या आणि सुटका होण्यास काही वर्षांचा कालावधी शिल्लक असणार्‍या कैद्यांना मध्यवर्ती खुल्या कारागृहात ठेवले जाते. खुल्या कारागृहात होणारी शेतीची सर्व कामे ही या कैद्यांकडूनच केली जातात. याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाच्या वतीने येरवडा कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यापुढे महाविद्यालयातील शेतात कैद्यांना कामे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कारागृह प्रशासनाने तो मंजूर केल्यानंतर 5 जानेवारीपासून या उपक्रमास सुरुवात झाली. 

गेल्या महिनाभरापासून महाविद्यालयातील शेतात कैद्यांकडून शेतातील खुरपणी, झाडांची छाटणी, फवारणी तसेच फळबाग व फुलांच्या शेतीतील कामे अद्ययावत तंत्रज्ञानाने करून घेतली जातात. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ 20 कैदी शेतात काम करण्यासाठी आणण्यात येत होते. सध्या त्यांची संख्या 30 वर गेली आहे. महाविद्यालयातील शेतीत काम केल्यानंतर प्रत्येक कैद्याला 201 रुपये मोबदला स्वरूपात देण्यात येतो. त्यांना प्रतिदिन मिळणार्‍या मानधनापैकी 61 रुपये देऊन उर्वरित रक्कम प्रशासनाकडे जमा केली जाते.

याबाबत महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. पी. एन. रसाळ म्हणाले, कारागृह तसेच कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे राज्यातील पहिला अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आजपर्यंत खुल्या कारागृहातील कैदी आवारातच शेतीची कामे करीत होते. शेतीची आवड आणि कैद्यांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रथमच कैद्यांना कारागृहाबाहेर शेती करण्यास परवानगी दिली आहे.

त्यानुसार कारागृहातील  तीस कैदी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात शेती करण्यासाठी येत आहेत. त्यांच्याकडून अळंबी प्रकल्प, फळ व फुलबाग आणि शेतीची कामे अद्ययावत तंत्रज्ञानाने करून घेतली जातात.  कारागृहातून तीस कैद्यांची रोज ने-आण करण्यासाठी महाविद्यालयाकडून वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत येथील शेतात कैदी काम करतात. कामाला येताना कारागृहाकडूनच दैनंदिन जेवणाचा डबा सोबत ते घेऊन येतात. कामासाठी जाताना प्रत्येक 15 कैद्यांमागे एक हवालदार पुरविण्यात येत आहे. सध्या कामासाठी येणारे कैदी हे प्रामाणिकपणे व लवकर कामे करतात.