होमपेज › Pune › प्रातर्विधीला बसलेल्या कैद्याला खिळा मारून केले जखमी

प्रातर्विधीला बसलेल्या कैद्याला खिळा मारून केले जखमी

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी 

येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने किरकोळ कारणावरून दुसर्‍या कैद्याला शौचास बसलेला असताना शिवीगाळ करून गालावर खिळा मारून जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. या प्रकरणी कैद्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्षय काशीनाथ जामदारे (कुदळवाडी, चिखली, सध्या येरवडा कारागृह) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे, तर गणेश ऊर्फ हनुमंत ननवरे असे जखमी कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहातील पोलिस शिपाई जीवनदास काळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय जामदारे एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे, तर गणेश ननवरे हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे. दोघेही एकाच सर्कलमधील एकाच बराकीमध्ये राहण्यास आहेत. त्यांच्या दोघांमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाले होते; तसेच काही किरकोळ वाद झाले होते. त्यामुळे ननवरे हा मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक 2 मधील शौचालयात प्रातर्विधीला बसला असताना अक्षय जामदारे तेथे आला. त्याने ननवरे याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या गालावर खिळा मारून त्याला जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.