Sun, Jul 21, 2019 01:43होमपेज › Pune › कारागृह विभाग; आठ ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करणार

आता कैदी चालवणार पेट्रोल पंप!

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:20AMपुणे : अक्षय फाटक

अबब... पेट्रोल पंपावर अन् कैदी... नवलच ना, हो पण हे खरंय...कारण आता राज्यातील आठ ठिकाणी नव्याने उभारण्यात येणार्‍या पेट्रोल पंपावर काम करणारे कामगार हे कैदी असणार आहेत... आणि तेच तुमच्या गाडीत पेट्रोलही टाकणार आहेत...! कारागृह विभागामार्फत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना रोजगार उपलब्धकरून देण्यासाठी राज्यातील आठ ठिकाणी कारागृह मालकीच्या जागांवर पेट्रोल पंप उभारण्याचे जेल प्रशासनाच्या विचारधीन आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रतील 54 कारागृहांमध्ये एकुण कैद्यांची संख्या 30 हजार आहे. त्यापैकी 8 हजार शिक्षा भोगत असलेले कैदी आहेत. या कैद्यांना नियमीत रोजगार उपलब्धकरून देणे ही कारागृह प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, कारागृह विभागाच्या मर्यादित साधन संपत्ती तसेच आर्थिक मर्यादांमुळे सर्व शिक्षाधीन कैद्यांना रोजगार देणे शक्य होत नाही. त्यातही विशेषत: खुल्या कारागृहात 1 हजार 100 बंदी शिक्षा भोगत आहेत. त्यांना शेती शिवाय कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. तर, शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर पुनर्वसनासाठीही विशेष योजना नाहीत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. 

कैद्यांसाठी संगीताचे कार्यक्रम आणि त्यासोबतच त्यांच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांमधील कारागृह परिसरातील जागांवर पेट्रोल पंप सुरू करण्यात आले आहेत. त्याठिकाणी कैदी पेट्रोल पंप चालवतात. त्याला चांगले यश मिळाले असून, कैद्यांना रोजगार उपलब्ध होत आहे, त्यासोबतच कारागृह प्रशासनालाही चांगले उत्पन्न मिळत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र कारागृह विभागाकडून राज्यातही पेट्रोल पंप उभारण्याचा विचार प्राधान्याने सुरू करण्यात आला आहे. 

कारागृह परिक्षेत्रात पेट्रोलपंप उभारणीस कारागृह प्रशासन जागा भाडे करारावर उपलब्ध करुन देईल. व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी पेट्रोलियम कंपनीची असणार आहे. कैद्यांना रोजगार देणे संस्थेला बंधनकारक आहे. कारागृह सेवानिवृत्त कर्मचारी, तसेच कारागृह कर्मचार्‍यांच्या आपत्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्याची तरतुद प्रस्तावात आहे. पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कैद्यांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाणार आहे. येथे काम करणार्‍या कैदी तसेच कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षण कंपनीकडून देण्यात येणार आहे. 

या आठ ठिकाणी सुरू होणार

कारागृह विभागाकडून राज्यातील येरवडा, कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृह, तसेच पैठण व मोर्शी खुले जिल्हा कारागृह या 8 कारागृहांच्या परिसरात पेट्रोल पंप प्रथम टप्प्यात उभारले जाणार आहेत. त्यानंतर इतर ठिकाणीही पेट्रोल पंप उभारणीचा विचार केला जाणार आहे. 141 कैद्यांना मिळणार रोजगार
राज्यातील आठ पेट्रोल पंपांवर जवळपास 141 कैद्यांना रोजगार मिळणार आहे. कारागृह विभाग पेट्रोल पंपांसाठी  40 चौरस मीटर जागा उपलब्ध करुन देणार आहे. कारागृह विभागास प्रत्येक पेट्रोल पंप प्रकल्पातून प्राप्त होणार्‍या एकुण उत्पन्नाच्या 75 टक्के रक्कम कारागृह कर्मचारी कुटुंब कल्याण निधीत जमा केली जाईल. तर, उर्वरित 25 टक्के रक्कम कैद्यांच्या कल्याण निधीमध्ये जमा करण्याची शिफारस प्रस्तावात आहे.