Mon, Apr 22, 2019 15:51होमपेज › Pune › कारागृह विभाग-एटीएसचे हातात हात 

कारागृह विभाग-एटीएसचे हातात हात 

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 1:33AMपुणे : अक्षय फाटक

कारागृह विभाग आणि राज्य दहशतवादीविरोधी पथक (एटीएस) आता दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार रोखण्यासाठी एकत्रित काम करणार आहेत. दहशती कारवायाच्या संशयावरून अटक केलेल्या कैदी व बंदिवानांना समुपदेशनाद्वारे धामिर्र्क मुलतत्त्ववादापासून परावृत्त केले जाईल. त्यांच्याकडून पुन्हा दहशतवादाचा प्रचार व प्रसार होणार नाही, अशा पद्धतीने त्यांचा ‘ब्रेन वॉश’ केला जाणार आहे. केंद्र शासनाकडून देशातील सर्व कारागृह विभागांना याबाबत नुकताच आदेश जारी केला. त्यानुसार महाराष्ट्राच्या दोन्ही विभागांनी त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कारागृहात असणार्‍या संशयित दहशतवाद्यांचे समुपदेशनाद्वारे मत परिवर्तन करण्यात येईल. यासाठी त्या-त्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाची मदत घेतली जाईल. याच पार्श्‍वभूमीवर पुण्यात याबाबत नुकतीच बैठक झाली. 

कारागृह विभागाचे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दहशतवादाचा प्रसार व प्रचार रोखण्यासाठीच्या उपायांची माहिती एटीएसकडून देण्यात आली. राज्य कारागृह विभागाकडून समन्वयक म्हणून सहायक आयुक्त राजेंद्र जोशी याचे काम करत आहेत.   इसिससारख्या दहशतवादी संघटनांचा देशाला मोठा धोका आहे. अनेक भारतीय तरुणांच्या डोक्यात ‘इसिस’ने कट्टरवादाचे विष कालवून दहशतवादी कारवायांत ओढले. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील काही तरुणही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या संघटनेचे काम करत असल्याचे उघड झाले होते. या दहशतवाद पसरवणार्‍या संघटनांकडून कोवळ्या वयातील मुलांचा  ‘ब्रेन वॉश’ करून भारत देशाबद्दल द्वेष भरला जातो. दहशतवाद्यांच्या डावपेचांना अनेक उच्चशिक्षित तरुण बळी पडल्याचे काही घटनांवरून दिसून आलेले आहे. त्यामुळे फोफावणारा दहशतवाद रोखण्यासोबतच  त्याचा प्रसार आणि प्रचार होऊ नये यासाठी केंद्र शासनाने पाऊल उचलले आहे. सध्या राज्यातील 8 मध्यवर्ती कारागृहांमध्ये एटीएसने दहशती कारवायांच्या संशयावरून पकडलेल्यांना ठेवलेले आहे.  
एटीएसकडून तब्बल 116 संशयितांना ताब्यात घेतले असून या सर्वांचे  समुपदेशन करून त्यांना मूळ मार्गावर आणले जाणार आहे. 

असे होणार प्रसार, प्रचार रोखण्याचे काम
दहशतवादी कारवायाच्या संशयावरून पकडलेल्यांना कारागृहात कुठे ठेवायचे? कोणत्या कैद्यांपासून लांब ठेवायचे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे; तसेच या संशयितांच्या प्रभाव किंवा दहशतीखाली येऊन सोबतचे अन्य कैदी दहशतवादी  कारवायांकडे वळणार नाहीत, यासाठी काय काळजी घ्यावी. त्यांना कुणाला भेटण्याची तसेच बोलण्याची परवानगी द्यायची याची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी मौलवींचेही सहकार्य घेण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत त्यांना मार्गदर्शन केले जाईल.  त्यांच्यासाठी विशेष व्याख्याने आयोजित करून ‘ब्रेन वॉश’ केला जाईल. 

दर तीन महिन्यांनी बैठक
राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी व प्रशिक्षक कारागृहातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतील. त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कारागृह विभागाचे अधिकारी व कर्मचारी  करतील. याबाबत विभागीय पातळीवर  वरिष्ठ अधिकार्‍यांची तीन महिन्यांनी बैठक होईल. त्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. नुकतेच ऑर्थर रोड आणि ठाणे कारागृहातील अधिकार्‍यांना एटीएसकडून याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.