Fri, May 24, 2019 21:31होमपेज › Pune › पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेस मुदतवाढीचा प्रस्ताव

पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेस मुदतवाढीचा प्रस्ताव

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 12:57AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पंतप्रधान कृषि सूक्ष्म सिंचन योजनेतंर्गत शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज करण्याची 31 डिसेंबर ही अखेरची तारीख देण्यात आलेली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत राज्यांतून 4 लाख 7 हजार शेतकर्‍यांनी अर्ज केले आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 87 हजार शेतकर्‍यांना कामासाठी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. केंद व राज्यांकडून उपलब्ध झालेल्या 658 कोटी रुपये पाहता योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्तालयातून देण्यात आली.

पाण्याचा काटकसरीने वापर करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याच्या सूचना केंद्र स्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारकडून संयुक्तपणे सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे. शासनाने पूर्वघोषित केल्यानुसार 31 डिसेंबरला ऑनलाईन अर्जांची मुदत संपण्यामुळे आणि निधीची उपलब्धता पाहता प्राप्त अर्जांची संख्या कमी आहे. शेतकर्‍यांकडूनही रब्बी हंगामातील पेरण्या संपत आल्याने ऑनलाईन अर्जास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभुमीवर मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

याबाबत कृषि आयुक्तालयाच्या फलोत्पादन संचालनालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सूक्ष्म सिंचनाचा मूळ कार्यक्रम 620 कोटी रुपयांचा होता. त्यामध्ये मराठवाड्यासाठी स्वतंत्र 100 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आल्याने राज्य स्तरावर 720 कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. तर योजनेत प्राप्त ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर 1.87 लाख शेतकर्‍यांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे.

तर सध्या छाननीत अंतिम स्थितीमध्ये असलेल्या सुमारे 1.50 लाख शेतकर्‍यांच्या अर्जांना पुढील आठवड्यात पूर्वसंमती दिली जाण्याची अपेक्षा आहे. उर्वरित अर्जांच्या छाननीचे काम सुरु आहे. त्यामुळे प्रस्तावानुसार शासनाकडून एक महिन्यांची मुदतवाढ येत्या आठवड्यात मिळण्याची अपेक्षा असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.