Sun, Sep 23, 2018 02:10



होमपेज › Pune › पंतप्रधान आवास योजना प्रकरण : बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पात साडेअकरा कोटींची घट

पंतप्रधान आवास योजना प्रकरण : बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पात साडेअकरा कोटींची घट

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:13AM



पिंपरी : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेतील बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त स्थायी समितीसमोर बुधवारी (दि.8) सादर करणार आहेत. फेरप्रस्तावानुसार केवळ प्लास्टरचा दर्जा बदलल्याने 11 कोटी 30 लाख 55 हजार 559 रक्कमेची पालिकेची बचत होणार आहे.  त्यामुळे 9 लाख 99 हजार 465 रुपयांची सदनिका आता 8 लाख 53 हजार 143 इतक्या कमी दरात उपलब्ध होणार आहे. तरीही, हा दर 27 हजार 995 रुपयांनी जास्तच आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत बोर्‍हाडेवाडीतील गृहप्रकल्पाच्या 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रूपये खर्चाचे काम  ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टरला देण्यास पालिका प्रशासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. सदर विषय अंतिम मंजुरीसाठी 18 जुलैला स्थायी समितीसमोर आला होता. गृहप्रकल्पाचे दर हे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा गृहप्रकल्पापेक्षा अधिक असल्याने कारण देत फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले होते. त्यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आयुक्तांना 6 जुलैला दिले होते.

बोर्‍हाडेवाडीत पालिकेतर्फे 1 हजार 288 आणि प्राधिकरणाकडून सेक्टर क्रमांक 12 येथे 2 हजार 572 सदनिका बांधण्यात येत आहेत. ठेकेदाराचा निविदेनुसार  आणि इन्फ्रास्ट्रक्चर कामांचा समावेश करून पालिकेच्या प्रतिसदनि का दर 9 लाख 99 हजार 465 रूपये आहे. तर, प्राधिकरणाचा प्रति सदनिका दर 8 लाख 25 हजार 148 रुपये आहे. तब्बल 1 लाख 74 हजार 317 रुपयांनी पालिकेचा वाढीव दर आहे. कारपेट एरिआचा प्रतिचौरस फुटाचा पालिकेचा दर 3 हजार 96 रुपये आणि प्राधिकरणाचा 2 हजार 599.54 रुपये दर आहे. या तुलनेत पालिकेचा दर तब्बल 496.46 रुपयांनी अधिक आहे. 
पालिकेची 14 मजली इमारत असून, प्राधिकरणाची 11 मजली इमारत आहे. प्राधिकरण इमारतीसाठी भिंतीच्या प्लास्टरसाठी वॉलकेअर पुट्टीचा समावेश आहे. तर, पालिका जिप्सम प्लास्टरचा वापर करणार आहे. तसेच, पालिकेने अ‍ॅल्युनियम खिडकी व प्राधिकरणाने एमएस खिडकी वापरली आहे. तसेच, पालिका निविदेमध्ये नामफलक, सदनिकाधारकांची एकत्रित नामफलक, लेटर बॉक्स, इमारतीचे नाव या खर्चाचा समावेश आहे. या बाबी फेरप्रस्तावामध्ये नमूद केल्या आहेत. 

अ‍ॅल्युनियम खिडकी कायम ठेवली जाणार आहे. मात्र, प्लास्टरचा प्रकार वगळल्यास केवळ इमारतीच्या आतील बाजूच्या फिनिशिंगमध्ये थोडासा फरक पडणार आहे. प्लास्टरचा दर्जा बदल्याने पालिकेचा प्रति चौरस फुटाचा दर घटून 2 हजार 641.94 रूपये होणार आहे. तर प्रति सदनिका दर 8 लाख 53 हजार 143 इतका असणार आहे. तरीही, हा दर प्राधिकरणाच्या सदनिकेच्या दरापेक्षा 27 हजार 995 रुपयांनी अधिक आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्याकडून अनुदान मिळणार आहे. त्यामुळे बदललेल्या ‘डीपीआर’ला शासनाची पुन्हा  मान्यता घ्यावी लागणार आहे.