Tue, Apr 23, 2019 00:37होमपेज › Pune › व्हॅलेंटाईन डेसाठी ‘प्रिटेंड’ गुलाब ‘मोस्ट फेव्हरेट’

व्हॅलेंटाईन डेसाठी ‘प्रिटेंड’ गुलाब ‘मोस्ट फेव्हरेट’

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी

प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ला गुलाबांची विशेष मागणी असते. सोशल मीडियाच्या जमान्यात मात्र फोटो तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याच्या भावना दृढ होत असतानाच, प्रिंटेड गुलाबांची क्रेझ वाढताना दिसते आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाच्या फुलांवर आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो तसेच संदेश छापून तो भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमवीरांमध्ये गुलाबाची देवाण-घेवाण फारच लोकप्रिय झाली होती. मात्र, व्हॉटस्अप, हाईक, फेसबुक आदी सोशल मीडियामुळे गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करण्याची पध्दत काहीशी मागे पडली होती. आता गुलाबाच्या फुलांवर आपल्या प्रिय व्यक्तीचे फोटो तसेच संदेश छापून प्रेम व्यक्त करण्याची पध्दत सुरू झाल्यानंतर गुलाबाला अच्छे दिन आले आहेत. 

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्‍वभूमीवर गुलाबाच्या फुलांवर छायाचित्रांसह आय लव्ह यू, हॅपी व्हेलेंटाईन्स डे, माय लव्ह आदी संदेश छापण्यात येत आहेत. या फुलांच्या पाकळ्या वाळल्यानंतरही छपाई टिकून राहत असल्याने, वाळलेल्या पाकळ्यांची फ्रेम तयार करून त्या आठवणीही जतन करून ठेवता येतात, त्यामुळे ही क्रेझ वाढते आहे. 

सध्या बाजारात संदेशाची छपाई करण्यात आलेले हे गुलाब 30 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर फोटोच्या छपाईसाठी एक दिवस अगोदर नोंदणी करावी लागते. हातछपाईद्वारे साकारलेली कला ही शहरात लोकप्रिय होत असून, फोटो व मनातील भावना व्यक्त करता येत असल्याने चांगला प्रतिसाद आहे. 

याबाबत बोलताना हर्षा लुनावत म्हणाल्या, पुर्वी दगड, माती, पाणी आदी घटकांवर छपाई करण्यात येत होती. मात्र, एखाद्या सजीव घटकावर छपाईची ही पहिलीच वेळ आहे. गुलाबाची फुले ही नाजूक असतात. त्यामुळे त्यावर कोणत्याही मशीन, हीट तसेच रसायन टाकून छपाई करता येत नाही. छपाई ही हातांद्वारे करण्यात येते. प्रथमत: व्यक्तीचा फोटो तसेच संदेश छापील स्वरुपात कापसावर घेण्यात येतो. त्यानंतर त्याचा छाप फुलांवर उमटविला जातो.