Wed, Nov 13, 2019 12:14होमपेज › Pune › पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नव्या चेहर्‍याला संधी?

पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नव्या चेहर्‍याला संधी?

Published On: May 23 2018 1:25AM | Last Updated: May 23 2018 12:13AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या 15 वर्षे एकहाती ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा, विधानसभा आणि गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत अक्षरश: पानिपत झाले. त्यामुळे पक्षाचे कारभारी व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करुन नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता.पिंपरी-चिंचवडला राज्यातील विकासाचे रोल मॉडेल केलेल्या राष्ट्रवादीला गत निवडणुकीमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. कारण, पक्षातील अनेकांनी वारे बघून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. घरभेदी प्रवृत्तीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत पराभव पत्करला. परंतु, पक्षाशी कोणत्याही आमिषाला बळी पडून काडीमोड घेतला नाही. सध्यस्थितीला पक्षाची जी काही ताकद शहरात दिसते. ती केवळ निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेमध्ये निष्ठावान आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

अजित पवार यांनी जुन्या मात्तबरांना सल्लागार व मार्गदर्शकाची भूमिका बजाविण्याच्या सूचना केल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते. तसेच, पक्ष संघटनेत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच ठिकाणचे पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराची जबाबदारी निष्ठावान आणि नवीन चेहर्‍याला मिळते की पुन्हा तेच-ते नेतृत्व कार्यकर्त्यांवर लादले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

विशेष म्हणजे महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदी जेष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नियुक्ती करण्यात आली. त्याद्वारे भोसरी विधानसभा मतदार संघात संभाव्य उमेदवारीच्या दृष्टीने ताकद देण्यात आल्याचे मानले जात आहे. त्याच धर्तीवर चिंचवडमधील संभाव्य उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ताकद देण्यासाठी शहराध्यक्षपदी चिंचवडमधील नव्या चेहर्‍याला संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सध्यस्थितीत शहरातून शहराध्यक्षपदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे,  राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, युवा नेते संदीप पवार आणि शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी, संदीप पवार आणि प्रशांत शितोळे यांना संधी देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीतील एका दिग्गज नेत्याने दिली. या पदासाठी प्रशांत शितोळे यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र; त्यांनी महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्याने अतुल शितोळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही कार्याध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली होती. तर; दुसरीकडे अजित पवार यांचा अज्ञाधारी निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या संदीप पवार यांना शहराध्यक्षपदी संधी मिळेल असा विश्‍वास संदीप पवार समर्थकांना आहे.

राष्ट्रवादीने संघटनात्मक पदांवर नव्या चेहर्‍यांना संधी देऊन सत्ताधारी भाजपचा प्रखर विरोध करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे त्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर विविध बदल करण्यात येत आहेत यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या पिंपरी चिंचवड शहरात अधिक लक्ष घातले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भ्रष्टाचार अथवा कोणताही आरोप नसलेला, उमेदीचा स्वच्छ चेहर्‍याने राष्ट्रवादीत संघटनात्मक पदावर काम करावा अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींची आहे.

संदीप पवार यांना निष्ठेचे फळ मिळणार का?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे. मुळशी पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रमणनाना पवार यांनी 2001 पासून राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. महापालिका समावेशानंतर ताथवडेच्या पहिल्या नगरसेविका यमुना पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकून शहराचेही लक्ष वेधले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत संदीप पवार यांनी ताथवडे पुनावळे, काळाखडक-वाकड प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष आणि विद्यमान गटनेते तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतील चिंचवड मतदार संघातील संभाव्य उमेदवार राहुल कलाटे यांच्याविरोधात काट्याची टक्कर दिली होती.

ताथवडे गावातील विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाविरोधात न्यायालयात स्थानिक नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू युवा चेहरा संदीप  पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये तयार होत आहे. शहराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत संदीप पवार यांच्या पक्षनिष्ठेचे अजित पवार फळ देणार की अन्य कोणाला संधी देणार याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.