Wed, Aug 21, 2019 14:48होमपेज › Pune › ‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांचे स्पेनमध्ये सादरीकरण

‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांचे स्पेनमध्ये सादरीकरण

Published On: May 19 2018 1:42AM | Last Updated: May 19 2018 1:39AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या आणि भविष्यात राबविल्या जाणार्‍या विविध प्रकल्पांचे सादरीकरण स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी  नुकत्याच झालेल्या स्पेनमधील बार्सिलोना बिल्डिंग टॉक्स या परिषदेत केले. 

‘शहरी नवकल्पना आणि नवीकरण : शहरांपासून सामग्रीपर्यंत’ अशी या आंतरराष्ट्रीय परिषदेची मुख्य संकल्पना होती. डॉ. जगताप यांनी ‘स्मार्ट सिटी, इंटेलिजंट सिटी किंवा पुढे काय’ या विषयावर सादरीकरण केले. या परिषदेदरम्यान आयोजित ‘नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त स्मार्ट तंत्रज्ञान’ या परिसंवादातही डॉ. जगताप यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात वास्तुविशारद व शहरी तंत्रज्ञानाच्या अभ्यासक प्रा. एरेती मार्कनपौलो आणि कॅटालोनिया येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड आर्किटेक्चरचे प्रा. रिकार्डो देवेसा यांचा सहभाग होता. डॉ. जगताप यांनी पुणे स्मार्ट सिटीमध्ये बिग डेटा अनॅलिटीक्सचा वापर या विषयावर सुद्धा या परिषदेमधील दुसर्‍या एका सत्रामध्ये सहभागी होऊन माहिती दिली. 

डॉ. जगताप यांनी आपल्या सादरीकरणात पुढील 30 वर्षांमध्ये नागरीकरण हा जागतिक पातळीवरील मोठ्या प्रमाणावरील बदलांचा वाहक आहे. त्यामुळे भारताच्या संदर्भात यातील मुख्य आव्हान हे 2030 पर्यंत भारताची 40% लोकसंख्या नागरी भागात राहणार्‍या लोकांच्या जीवनाचा दर्जा वाढवणे हा आहे. त्या दृष्टिकोनातून भारतीय शहरांना पुढील काळात मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी मिशन ही केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजना नागरी समस्या सोडवण्यासाठी अतिशय 
महत्त्वाची आहे. 

शहराचा परिसर अधिक हरित तसेच सार्वजनिक जागा अधिक आकर्षक व नागरीकी-सुविधा केंद्रित करण्यावर स्मार्ट सिटीच्या उपकरणांचा भर राहील. नजीकच्या काळामध्ये मोफत तपासणी केंद्रे सुरु करून प्राथमिक आरोग्य सुधारण्यावर स्मार्ट सिटीचा भर राहील. शासकीय शाळांचे मॉडेल (आदर्श) शाळांमध्ये रूपांतरण करून पुढील शैक्षणिक वर्षाआधी त्या सुरु करण्याचा स्मार्ट सिटीचा मानस आहे. नजीकच्या काळामध्ये शहरामध्ये कार्यक्षम ई-कनेक्टिव्हीटी सुविधा विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटी काम करत असल्याचे नमूद केले.