होमपेज › Pune › अल्पवयीन मुलींमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन वाढले

अल्पवयीन मुलींमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन वाढले

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 10:57PMपिंपरी : पूनम पाटील

हल्लीची तरुण पिढी चंगळवादाकडे झुकत असून दिवसेंदिवस नको त्या गोष्टींचे आकर्षण व वापर या पिढीकडून वाढतच आहे. इंटरनेट व तंत्रज्ञानाचा सहज वापराचा एक दुष्परीणाम म्हणून कमी वयातच मुलामुलींना एकमेकांचे आकर्षण वाटत असून त्यातून शारीरीक संबंधांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे गर्भधारणे पासून वाचण्यासाठी घेण्यात येणार्‍या कॉन्ट्रासेप्टीव्ह ओरल टॅबलेटची मागणी शहरात दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे कमी वयातील मुलींकडून या गोळ्यांची अधिक प्रमाणात मागणी होत असून कमी वयातच मुलींचे या गोळ्या सेवन करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब निश्‍चितच मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चीतच चिंताजनक असल्याचे मत शहरातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ व स्त्री रोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

शहरातील विविध मेडीकल स्टोअर्स मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री होत असल्याची माहीती एका औषधविक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. एकीकडे विवाहपूर्व संबंधांमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे कमी वयातच मुलामुलींत शारीरीक संबंध घडून येत आहेत. एका सर्वेक्षणांअंती देशातील 20 प्रमुख शहरात 13 ते 19 वर्षे वयातील मुलांमुलींकडून माहीती घेण्यात आली. त्यात 14 वर्षापेक्षा कमी वयाची मुले व 14 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलीं यांचे शारीरीक संबंधाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहीती उघड झाली. दरम्यान सावधानीचा उपाय म्हणून शहरातही या गोळयांचे सेवन वाढत असून मागणीही वाढत असल्याचे समोर आले आहे. कमी वयातच गर्भनिरोधक गोळ्याचे सेवन हे निश्‍चितच मुलींसाठी हानिकारक असून याचे दुष्परीणाम होतात. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार या गोळ्यांचे सेवन करावे असे आवाहन स्त्री रोग तज्ज्ञांनी केले आहे.