Wed, Feb 20, 2019 18:55होमपेज › Pune › 'अर्थव्यवस्था बळकटीसाठी गोसेवेला प्राधान्य द्या'

'अर्थव्यवस्था बळकटीसाठी गोसेवेला प्राधान्य द्या'

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 1:41AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

भारतासारख्याच अनेक लहान, मोठ्या देशांमध्ये गाईला खूप महत्त्व दिले जाते. काही देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच गाईवर अवलंबून आहे. त्यात ब्राझिल देशही आहे. या सर्व देशांप्रमाणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करावयाची असेल तर गाईच्या जोपासनेला आणि संवर्धनाला अधिक प्राधान्य द्यावे, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी व्यक्त केले.

गोविज्ञान संशोधन संस्था, जनमित्र सेवा संघ, यशोदा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गोसेवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, हुकुमचंद सावला, मिलिंद मराठे, डॉ. राजेंद्र फडके, राजेंद्र लुंकड, महेंद्र देवी उपस्थित होते. 

केंद्रीय राज्यमंत्री रुपाला व पालकमंत्री बापट यांच्या हस्ते ‘कामधेनू’ स्मरणिकेचे आणि मोरेश्वर जोशी लिखित ‘गोवंश’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रुपाला म्हणाले, देशात अनेक समस्या वाढत आहेत. त्या समस्यांचे निराकरण गाय पाळण्यात आहे. शेण, गोमुत्रापासूनही आर्थिक उत्पन्नात वाढ होते. गोकूश मिशनद्वारेे केंद्राने देशी गाईंची संख्या वाढण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गोशाळांनीसुद्धा गोवंशाच्या वृद्धीकरिता सक्रिय व्हावे. पालक आपल्या पाल्यासाठी पन्नास लाख, एक कोटीच्या गाड्या खरेदी करून देतात, पण गाईसाठी गुंतवणूक केली तर शुद्ध आणि चांगले दूध तरी प्यायला मिळेल.

पालकमंत्री बापट म्हणाले, मानवजातीचा फायदा गोरक्षणात आहे. म्हणूनच राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील गोशाळांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वतंत्रपणे गो आयोग किंवा मंत्रालय करायचे का? यावरही सरकार विचार करत आहे. धान्याच्या लिलावापेक्षा गोशाळांतील गाईंना मका, गहू यासारखे धान्य खाऊ घालावे, असाही विचार आम्ही करत आहोत.