होमपेज › Pune › भाकणुकीचे पर्जन्य अंदाज मिळतेजुळते!

भाकणुकीचे पर्जन्य अंदाज मिळतेजुळते!

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:49AMपुणे : किरण जोशी

यंदा पावसास उशिरा सुरुवात होईल, मान्सूनचे ढग विखरून जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडणार नाही. मात्र, जुलैमध्ये कसर भरून काढत धो-धो पाऊस पडेल...! सद्य:स्थितीशी मिळताजुळता हा अंदाज पंचांग, ग्रामीण भागात कोणत्याही शास्त्राचा आधार न घेता केली जाणारी ‘भाकणूक’ आणि पक्ष्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. सरकारी यंत्रणेने या अंदाजांची नोंद घेतल्यास याचा नक्कीच फायदा होऊ शकेल, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.

दक्षिण काशी अशी ख्याती असणार्‍या पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेत दरवर्षी भाकणूक केली जाते. कोणत्याही शास्त्राचा आधार न घेता केल्या जाणार्‍या भाकणुकीत येणारा अंदाज परिस्थितीशी मिळताजुळता दिसून येतो. ही परंपरा जोपासणारे तात्या बुरुंगले म्हणाले, दरवर्षी यात्रेमध्ये पाऊस-पाण्याची भाकणूक केली जाते. धान्याच्या पुड्या चार दिशेला (आंबराईत) टाकून दुसर्‍या दिवशी सोडल्या जातात. ज्या धान्याला कोंब फुटले आहेत त्या दिशेला चांगला पाऊस पडणार, असा अर्थ निघतो. यंदा उशिरा पण चारही बाजूला चांगला पाऊस पडेल आणि पीक जोमाने येईल, असा अंदाज आहे आणि तो खराही ठरत आहे.

पंचांगाचे अंदाज ‘सही रे सही’

पंचांगामध्ये पावसाचे अंदाज दिले जातात. याबाबत ज्योतिष तज्ज्ञ सिद्धेश्‍वर मारटकर म्हणाले, ‘मेदिनिय’  अर्थात पृथ्वीच्या घडामोडींशी संबंधित अभ्यास ज्योतिषशास्त्रात केला जातो. संक्रमण कुंंडली, पावसाळी काळातील मेष, कर्क आणि तूळ या कुंडल्या आणि पाौर्णिमा-अमावस्येवरून पत्रिका मांडून ज्योतिषशास्त्रात पावसाचे भाकित केले जाते. ही भाकिते खरी ठरत असल्याने, हवामान खात्याने ज्योतिषशास्त्रातील भाकितांची नोंद घेतल्यास अधिक अचूक अंदाज देता येऊ शकतो. मात्र, याकडे अनेकवर्ष दुर्लक्ष केले जात आहे.    पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले, ज्योतिष हे देखील एक शास्त्र आहे. पर्जन्यविषयक धोरणे राबविताना याचा वापर करून घेतल्यास फायदा होऊ शकतो. अनेक शेतकरी अजूनही या आधारेच पीक-पाण्याचे नियोजन करतात. यंदा उशिरा पाऊस पडेल, पण पुढील नक्षत्रांचा अंदाज घेता, जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडेल, असे भाकित आहे.

घरट्यांवरून अंदाज...

चातक पक्षीही ‘पिक पिक’ असा आवाज करत  पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. या स्थलांतरित पक्ष्यांचे आपल्याकडे आगमन झाल्यावर पावसाचेही आगमन होते. कावळ्यासारखा पक्षीही किती पाऊस पडणार आहे, याचा शेतकर्‍यांना अंदाज देतो. कोकणात समुद्र किनार्‍यावर पक्ष्यांचे थवे दिसू लागले की, वादळाची सूचना मिळते, तसे  कावळ्याने झाडावर पूर्वेला घरटे बांधले तर पाऊस चांगला पडतो आणि पश्चिमेला बांधले असेल तर पाऊस कमी पडतो, हे ठरलेलेच. झाडाच्या टोकावर कावळ्याने घरटे बांधले असेल तर दुष्काळ पडतो. याचे कारण पाऊस पडणार नसेल तर धोका नाही म्हणून कावळे झाडाच्या टोकावर घरटे विणतात. त्यामुळे अजूनही या घरट्यांवरून शेतकरी पाऊस आणि पिकांचा ठोकताळा बांधतात.

पावशा सांगतो ‘पेरते व्हा...’

पावसाचे आगमन कधी होईल, तो कधी थांबेल या दोन्ही गोष्टींचा अंदाज पक्ष्यांच्या गमन-आगमनावर तंतोतंत खरे ठरतात. शिटीसारख्या आवाजात पेरते व्हा... पेरते व्हा.. असे सांगणारा पावशा या पक्ष्याच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे.  खरेतर तो पावसाची वर्दी  घेऊन येतो. याउलट धोबी पक्षी आला की पाऊस थांबणार, हे निश्‍चित मानले जाते. याबाबत शेतकरी रावसाहेब बानगुडे म्हणाले, ग्रामीण भागात अजूनही पक्ष्यांच्या हालचालीवरून शेतीचे ठोकताळे बांधले जातात. पावशा या पक्ष्याचा आवाज ऐकल्यावर पेरणी करण्याचा संदेश मिळतो, पण अलीकडच्या काळात या पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे.