Fri, Apr 19, 2019 12:12होमपेज › Pune › चाकण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर

चाकण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:41AMचाकण : वार्ताहर

मराठा समाजाच्या सोमवारच्या हिंसक चाकण बंदनंतर मंगळवारी शहरातील  परिस्थिती पूर्वपदावर आली. याप्रकरणी मंगळवारी तब्बल 5 हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तोडफोड व जाळपोळ करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

चाकण येथील आंदोलनादरम्यान शासकीय व खासगी अशी 35 वाहने पेटवून देऊन एकूण 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासह आंदोलकांनी चाकण नगर परिषदेची अग्निशमन वाहनही पेटवून दिले होते. तसेच तळेगाव चौकातील पोलीस चौकीही जाळून टाकली. यासोबतच एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्याने मंचर व राजगुरुनगर आगाराचे 15 लाखांचे नुकसान झाले.

मंगळवारी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी एसटी बस गाड्यांची तोडफोड करून जाळपोळ केल्याने शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे असा प्रकार दुसर्‍या दिवशीही होऊ नये आणि त्यातून होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी या मार्गावरील एसटी बसेस मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या.  

चाकण पोलिस स्टेशनमध्ये अधीक्षक संदीप पाटील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, आम्ही परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून, शहरात  शांतता आहे. रास्ता रोको आंदोलनात एसटी बस, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या बस गाड्या आणि खासगी बस, ट्रक, दुचाकी पेटवून देणार्‍या समाजकंटकांचा शोध सुरू आहे. 
जाळपोळीचे आंदोलन कुणी घडवून आणले का याचाही पोलिस गुप्तपणे शोध घेत आहेत.