Fri, Apr 19, 2019 08:32होमपेज › Pune › तरुणाचा दगडाने ठेचून खून

तरुणाचा दगडाने ठेचून खून

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:50AMपुणे : प्रतिनिधी

धायरी भागातील गणेशनगरमध्ये तरुणाचा पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून खून केला. रविवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  

अभिषेक बाळासाहेब पोकळे (वय 25, रा. नानज रेसिडेन्सी, पिंपळाचा वाडा, धायरीगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर श्रीमंत घुगे (वय 28, रा. लक्ष्मी विलास सोसायटी, आनंदनगर), विशाल सेवकानंद वाघ (वय 35), विकास विश्वनाथ पोकळे (वय 26, दोघे रा. रायकरनगर) या तिघांना अटक केली आहे. यासंदर्भात सागर भगवान लांडे (वय 25, रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर लांडे हे ओला कॅबचालक आहेत. रात्री दोनच्या सुमारास ते धायरीत प्रवाशाला सोडण्यासाठी गेले होते. त्यांनी प्रवाशाला सोडल्यानंतर ते गणेशनगर येथील नगरसेवक हरीश चरवड यांच्या कार्यालयाजवळ थांबले होते. त्या वेळी  चरवड यांच्या कार्यालयासमोर एकजण बुलेटवर बसला होता. तर इतर चौघे उभे होते. त्यांच्यात वाद सुरू होता. बुलेटवर बसलेल्या व्यक्तीने हे भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच, एकाला बुलेटवर बसवत तेथून निघाला. त्या वेळी एकाने गाडीवर पाठीमागे बसलेल्याला ओढून जमिनीवर आदळले. तसेच, वीट त्याच्या डोक्यात घातली. बुलेटवर बसलेला घाबरून तेथून पळून गेला. त्यानंतर तिघांनी डोक्यात आणि तोंडावर  मोठा दगड घालून निर्घृण खून केला. त्यानंतर तिघे तेथून पसार झाले. हा सर्व प्रकार फिर्यादी यांनी कारमध्ये बसून पाहिला. त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. 

सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी खून झालेल्याचे नाव अभिषेक पोकळे असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्या वेळी तिघे कॅनॉलच्या बाजूने शेतातून पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सिंंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप व कर्मचारी संतोष सावंत, दया तेलंगे पाटील यांनी त्यांना शोधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अभिषेक पोकळेचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान अभिषेक पोकळे याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात एक मारहाणीचा व रॉबरीचा गुन्हा दाखल आहे. तर, विशाल वाघ याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. विशाल वाघ व अभिषेक पोकळे यांच्यात ऑगस्टमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या कारणावरून तिघांनी अभिषेक याचा खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप हे करत आहेत.