Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Pune › प्रतिभाताईंनी मूल्यांशी तडजोड केली नाही 

प्रतिभाताईंनी मूल्यांशी तडजोड केली नाही 

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:07AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दल इतर वक्त्यांनी बोलताना त्या खूप मृदूभाषी असल्याचे सांगितले. मात्र, मी मुख्यमंत्री असताना अतिशय कठोर विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांना अनुभवले आहे. त्या वेळी आपल्या भूमिकेशी आणि मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या मालिकेत प्रतिभा पाटील यांचे स्थान मोठे आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.  

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीच्या सन्मानार्थ ‘भारताची प्रतिभा’ या गौरवग्रंथाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 

या वेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील,  माजी गृहमंत्री शिवराज पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अजिंक्य डी. वाय. पाटील, खा. वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, आ. शरद रणपिसे, बाळासाहेब थोरात, विश्‍वजित कदम, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.  

पवार म्हणाले, त्यांचे (प्रतिभाताईंचे) मुख्यमंत्रिपद खरंतर मीच हिरावून घेतले. मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा तो त्यांचा हक्क होता; मात्र विधिलिखित टाळता येत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यांच्या काळात राष्ट्रपती भवन सामान्य माणसांसाठी कायम खुले राहायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. देवीसिंह शेखावत यांच्यासारखा त्यांच्या कर्तृत्वाला साथ देणारा पती त्यांना मिळाला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताईंनी आपल्या बालपणापासून ते  राजकीय कारकीर्दीपर्यंतच्या आठवणींचा धावता आढावा घेतला. तरुणपणीच त्यांनी देशकार्याला वाहून घेण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. वडील अतिशय रूढीवादी विचाराचे होते, पण सासर तर अधिक रुढीवादी होते; मात्र तरीही देवीसिंह शेखावत यांनी लोकांमध्ये राहणार्‍या मुलीशी लग्न करण्याचे धाडस केले, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री होण्याची संधी शरदरावांनी हुकवली, पण त्यांनी मला जेलमध्ये टाकले, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी पहिल्यांदा मी वडिलांच्या डोळ्यांत अश्रू बघितले. असं करता करता 50 वर्षे कशी उलटली, हे समजलंच नाही, असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला असल्याने याप्रसंगी त्यांचीही आठवण आल्यावाचून राहत नाही, असे त्या म्हणाल्या. मी एक स्त्री असल्याचा मला अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविक करताना अजिंक्य पाटील यांनी बोलताना प्रतिभाताईंच्या राष्ट्रपतिपदाच्या कारकिर्दीचा गौरव केला. त्यांनी बोलताना प्रतिभाताई यांनी विविध राज्यांमध्ये केलेल्या कामांचा उल्लेख करीत अनेक आठवणी जागवल्या. त्यांच्यामध्ये असलेल्या ममत्वाचा अनुभव सांगितला. आजही त्यांच्या घरी गेल्यावर आदरातिथ्य केल्याशिवाय त्या परत पाठवत नाहीत, असे ते म्हणाले.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी बालगंधर्व रंगमंदिराची स्थापना झाल्यापासून झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमांपैकी आजचा ‘भारताची प्रतिभा’ हा कार्यक्रम पार पडत आहे, असे सांगितले. राजकीय जीवनात प्रतिभाताई यांचा प्रवास आगळावेगळा आहे. त्याची नोंद इतिहासात व्हायला हवी. जळगावपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्लीपर्यंत पूर्ण झाला. निवृत्त झाल्यावर त्या पुणेकर झाल्या आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा पुणेकरांचा सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात देशातील सर्व राजधान्यांमध्ये प्रतिभाताईंच्या सोबत केलेल्या प्रचाराच्या काळातील आठवण सांगितली. त्या वेळी सुमारे एक महिन्यात संपूर्ण देश त्यांनी पालथा घातल्याचे त्यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना माणसं कशी निवडावीत, हे आम्ही प्रतिभाताईंमुळे शिकलो असल्याचे सांगितले.

शिवराज पाटील यांनी बोलताना प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्यावर आपल्याला विस्तृत दृष्टिकोनाचे दर्शन घडल्याचे सांगितले. त्यांच्या काळात इतर देशांशी अतिशय चांगले संबंध निर्माण झाले आणि देशाची मान उंचावल्याचे संगितले. त्यांनी केलेले काम कायमच देशाच्या, लोकशाहीच्या हिताचे होते, असेही ते म्हणाले. मधुकर भावे यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘राष्ट्रपतिपदाचा रस्ता माझ्यासाठी नाही’

एकदा राष्ट्रपती किंवा राज्यपाल झाले की, निवृत्त व्हावे लागते. शेवटपर्यंत लोकांमध्ये जाता यावे म्हणून हा रस्ता माझ्यासाठी नाही, अशा शब्दांत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भविष्यात राष्ट्रपती होण्याची शक्यता फेटाळून लावली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी उपस्थित राहणार होते. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना येता आले नाही. त्यामुळे पवार यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी माजी राष्ट्रपतींच्या हस्ते नसला, तरी भविष्यात राष्ट्रपती होणार्‍या शरद पवार यांच्या हस्ते प्रतिभाताईंचा सत्कार होत असल्याचे सांगितले.

त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्या वाजवून दादही दिली. पवार यांनी मात्र लगेचच हात उंचावत नकार दिला. मात्र, त्यावर शिंदे यांनी, मी  पवार यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते नक्की राष्ट्रपती होतील, असे उद्गार काढले. पवार यांच्या रुपाने ‘कात्रजचा घाट’ कसा पास करावा, हे शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर पवार यांनी आपल्या भाषणात याचे उत्तर दिले. एकदा राष्ट्रपती किंवा राज्यपाल झाले, की निवृत्त व्हावे लागते. याला अपवाद फक्त शिंदे यांचा असून, ते राज्यपाल झाल्यावरदेखील नंतर गृहमंत्री झाले, असे सांगत पवार यांनी शिंदे यांना चिमटा काढला. मात्र, मला शेवटपर्यंत लोकांमध्ये जायचे असल्याने हा रस्ता माझ्यासाठी नाही, असे सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविरामही दिला.