Fri, Jul 19, 2019 17:47होमपेज › Pune › पीएमपीएमएल’ने ‘प्रसन्न’कडून घेतल्या १८५ बसेस ताब्यात

पीएमपीएमएल’ने ‘प्रसन्न’कडून घेतल्या १८५ बसेस ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रसन्न पर्पल मोबिलीटी प्रा.लि. या कंपनीकडून 200 पैकी 185 बस ताब्यात घेतल्या असून त्यापैकी 135 बस रस्त्यावर असल्याची माहिती ‘पीएमपीएमएल’मधील सूत्रांनी दिली. दरम्यान राहिलेल्या बस दुरूस्तीनंतर लगेचच घेतल्या जाणार आहेत.

प्रसन्न पर्पल मोबिलीटी कंपनीकडून कोथरूड डेपोमध्ये 101 तर पिंपरी चिंचवड येथे 99 बस कंत्राटी पद्धतीने चालविल्या जात होत्या. करारानुसार बस आणि वाहक ‘पीएमपीएमएल’चे होते तर चालक आणि मेंटेनन्स ठेकेदार कंपनीचे होते. हा ठराव 10 वर्षासाठी झाला होता. मात्र वेळेवर बस न पाठवणे, चालकांचे वेतन न दिल्यामुळे चालकांनी संप करणे, यामुळे नागरिकांना होणारा त्रास आदी कारणांची दखल घेवून व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रसन्न पर्पल कंपनीबरोबर असलेल्या करार नुकताच रद्द केला.

त्यानंतर प्रशासनाने संबंधित कंपनीकडून पिंपरीमधील 99 बसपैकी 95 तर कोथरूडमधील 101 पैकी 91 अशा एकूण 185 बस ताब्यात घेतल्या. राहिलेल्या बस दुरूस्त करून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या 185 बसपैकी 135 बस प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर आहेत. 

प्रसन्न पर्पल बसवरील चालकांनी वेतनासाठी दोन महिन्यात दोनदा अचानक संप केला. या संपामुळे पुणेकर नागरिकांची आणि पीएमपीएमएल प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पहिला संप केल्यानंतर प्रत्येक बस पाच हजार रूपये या प्रमाणे संबंधित ठेकेदाराला दंड केला होता. तसेच पुन्हा संप होवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने दिली होती. तरीही पुन्हा संप झाल्यामुळे अखेर प्रशासनाने प्रसन्न पर्पल बरोबर असलेला करार रद्द केला आणि त्या बस स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 185 बस ताब्यात घेतल्या आहेत.