होमपेज › Pune › ...तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होऊ शकतात : छत्रपती शाहू महाराज

आत्ता आम्ही सत्ताधारी होणार : प्रकाश आंबेडकर

Published On: Jun 10 2018 9:55AM | Last Updated: Jun 10 2018 9:56AMपुणे : प्रतिनिधी

मुस्लिम समाजाच्या विरोधात कुरापती काढूनही मुस्लिम समाज उत्तर देत नाही. मुस्लिम समाजाने काही झाले तरी शांत बसण्याचे धोरण स्वीकारल्याने देशात दंगली घडविण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आरक्षणाविरोधात मोर्चे-आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. देशात दंगली घडवून देशातील वातावरण अस्वस्थ करण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचा घाणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भटक्या विमुक्त जाती संघटना आयोजित 7व्या पंचवार्षिक अधिवेशनात शनिवारी अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. या वेळी छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर), पद्मश्री लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, सुशीला मोराळे, शारदा खोमणे, बाबूराव धोत्रे, म. ना. कांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी मतदान प्रक्रियेत भटक्या विमुक्तांना स्थान नसल्याचा आरोप करत ईव्हीएम मशिनचे दहन करण्यात आले.

राज्यातील शंभर कुटुंबांच्या हाती सत्ता राहिली म्हणजे राज्यातील सर्वसामान्यांचा विकास झाला, असे होत नाही. आम्हाला बरोबर घेऊन जाण्याचा भंग झाला आहे, त्यामुळे आत्ता आम्ही सत्ताधारी होणार आहोत. त्यासाठी आपल्यातील बहुजनपणा मतातून दिसला पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेबांची घटना कोणीही बदलू शकत नाही. लोकशाहीत काहीच अशक्य नाही. एकता असेल तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र त्यासाठी अंतर्गत हेवेदेवे दूर ठेवणे गरजेचे आहे. जातपात याच्या पलीकडे जाऊन समविचारी पक्षांशी हातमिळवणी केली पाहिजे.

लक्ष्मण माने म्हणाले, मंत्र्यांच्या आणि अधिकार्‍यांच्या दालनात आरएसएस स्वयंसेवक बसतात. त्यांनी हिरवा कंदील दिल्याशिवाय काम होत नाही. जातीयवादी सरकार घालवायला हवे. आम्हाला देशात हजेरी असताना फक्त कोल्हापूर संस्थानात आम्हाला हजेरी नव्हती. आवाज उठवल्यानंतर नक्षलवादी म्हणता, नक्षलवाद कशाला म्हणतात, हे मी शिकवतो.

प्रणव मुखर्जींनी केली विचारांशी प्रतारणा
ज्या विचारसरणीमुळे आणि ज्या पक्षामुळे प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले, त्या विचाराशी आणि पक्षाशी त्यांनी इमानदारी राखली नाही. त्यांनी आरएसएसच्या व्यासपीठावर जाणे योग्य नव्हते. ते ज्या तीन सैन्यदलाचे पाच वर्षे प्रमुख होते, त्या दलांवर विेशास नाही का? ज्या राज्यघटनेमुळे मुखर्जी राष्ट्रपती झाले, ती राज्यघटना तुम्ही बदलणार आहात का? अशी विचारणा मुखर्जी यांनी ठणकावून नागपुरातील व्यासपीठावरून आरएसएस स्वयंसेवकांना करणे गरजेचे होते, असेही आंबेडकर म्हणाले.

पोलिसांच्या आरोपांवर बुधवारी मुंबईत बोलणार नक्षलवाद्यांना प्रकाश आंबेडकर मदत करत असल्याचा उल्लेख एका पत्रामध्ये सापडल्याचा आरोप पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या आरोपावर बुधवारी (13 जून) मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.