Thu, Apr 25, 2019 06:09होमपेज › Pune › प्रधानमंत्री आवास योजनेची कामे संथ गतीने

प्रधानमंत्री आवास योजनेची कामे संथ गतीने

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:32PM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे दारिद्य्ररेषेखालील जनतेला हक्काचा निवारा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रस्थापित लक्ष्य (टार्गेट) पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 2016-17 आर्थिक वर्षात 13 तालुक्यात मिळून 8 हजार 163 घरांचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र, विविध कारणांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेची फक्त 1 हजार 338 कामे पूर्ण झाली आहे. तर 6 हजार 825 घरांची कामे विविध टप्प्यात अडकली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लाभार्थ्यांना अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात घरांची कामे पूर्ण करणार्‍या 97 टक्के लाभार्थ्यांना अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

तर अनुदानाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 67 टक्के लाभार्थींना हप्ता वर्ग करण्यात आला आहे. मात्र, तिसर्‍या टप्प्यातील घरांची कामे रखडल्याने अवघ्या 19 टक्के लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 75 टक्के लाभार्थींची घरे रखडली आहेत.  जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 440 घरांचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी फक्त 19 घरांची पूर्तता झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

तर बारामतीत 1 हजार 179 घरापैकी 183, भोरमध्ये 248 पैकी 88, दौंड 750 पैकी 182, हवेली 354 पैकी 99, इंदापूर 2 हजार 19 पैकी 130, जुन्नर 1 हजार 10 पैकी 87, खेड 690 पैकी 166, मावळ 361 पैकी 82, मुळशी 209 पैकी 42, पुरंदर 361 पैकी 68, शिरुर 421 पैकी 89, वेल्हे 121 पैकी 41 घरांची पूर्तता झाली आहे. त्यामुळे उर्वरित घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेची दमछाक होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 8 हजार 163 पैकी 6 हजार 26 घरांना ऑनलाइन मंजुरी देण्यात आली आहे. तर 5 हजार 875 अर्जदारांच्या खात्यांची खात्री करण्यात आली आहे. तसेच 5 हजार 864 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. 

तर दुसर्‍या टप्प्यातील अनुदानाचे 4 हजार 42 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. तसेच तिसर्‍या टप्प्यात फक्त 1 हजार 158 लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.