Mon, Apr 22, 2019 22:30



होमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’चे भूमिपूजन लवकरच

‘पंतप्रधान आवास’चे भूमिपूजन लवकरच

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:38PM



पिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजना शहरात राबविण्यात येत असून, चर्‍होली व रावेत येथील इमारती बांधण्याच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. मोशीतील बोर्‍हाडेवाडीच्या कामाची फेरनिविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे इमारत कामाचे भूमिपूजन लवकरच होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

महापालिकेतर्फे शहरातील दहा वेगवेगळ्या भागांत सर्वसामान्यांना परवडतील अशा एकूण 9 हजार 458 सदनिका बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या मान्यतेची प्रक्रिया तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळापासून सुरू झाली. योजनेचा प्रत्यक्ष पाठपुरावा सत्ताधारी भाजप  व पालिका प्रशासन घेत आहे. या कामातील विविध परवानग्या व मंजुरी देण्यासाठी राज्य व केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याने तातडीने चार ठिकाणच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. 

चर्‍होली येथे 1 हजार 442 सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्याचा खर्च 150 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. रावेतमध्ये  1 हजार 80 सदनिका उभ्या राहणार असून, त्याकरिता 91 कोटी 6 लाख खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून, ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या दोन्ही ठिकाणच्या कामास सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.  बोर्‍हाडेवाडीमध्ये 1 हजार 400 सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 110 कोटी 90 लाख खर्च अपेक्षित आहे. या निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने फेरनिविदा 12 फेबु्रवारीला प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याची मुदत 23 फेबु्रवारीपर्यंत आहे. ठेकेदारांचा प्रतिसाद पाहून हाही प्रकल्प मार्गी लागणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

एकूण 9 हजार 458 सदनिका

शहरात 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार चर्‍होली येथे 1 हजार 442 घरे (खर्च 150 कोटी 32 लाख), रावेतमध्ये 1 हजार 80 (91 कोटी 6 लाख), डुडुळगावमध्ये 896 (74 कोटी 13 लाख), दिघीत 840 (69 कोटी 50 लाख), बोर्‍हाडेवाडीमध्ये 1 हजार 400 (135 कोटी 90 लाख), वडमुखवाडीत 1 हजार 400 (115 कोटी 84 लाख), चिखलीमध्ये 1 हजार 400 (115 कोटी 84 लाख), पिंपरीत 300 (खर्च 24 कोटी 82 लाख),  पिंपरीतच आणखी 200 (खर्च 16 कोटी 54 लाख) आणि आकुर्डीमध्ये 500 (खर्च 41 कोटी 37 लाख) घरे बांधण्यात येणार आहेत. एकूण 935 कोटी 31 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून काही निधी मिळणार आहे. उर्वरित प्रकल्पाचे डीपीआर मंजुरीसाठी राज्य व केंद्राकडे प्रलंबित आहेत. 

प्रत्यक्ष काम सुरू करणारी देशातील पहिली पालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेस राज्य शासनाकडून मान्यता घेतली. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. त्यास राज्यापाठोपाठ केंद्रानेही मंजुरी दिली आहे. दहापैकी तीन ठिकाणच्या कामांना दोन्हीकडून मंजुरी मिळाली असून, निविदा प्रक्रियाही राबविली जात आहे. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू करणारी पिंपरी-चिंचवड ही पहिली महापालिका ठरणार आहे, असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.