Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Pune › सत्ताधार्‍यांना ‘शहाणपण देगा देवा’

सत्ताधार्‍यांना ‘शहाणपण देगा देवा’

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:30AMपिंपरी : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या वागणुकीचा भारतीय जनता पार्टीने पालिकेच्या निवडणुकीत ‘प्रपोगंडा’ केला होता. त्यानंतर सत्तेत असलेल्या  भाजपाने सत्तेचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्यावर भर दिल्यामुळे शहरवासियांमध्ये यबाबत उलट-सुलट चर्चा आहे. त्याचे विरोधकांना आयते कोलित मिळत असल्याने पालिकेतील सत्ताधार्‍यांचे ‘कान टोचण्यासाठी शहर व प्रदेश पातळीवरील वरिष्ठांना ‘शहाणपण देगा देवा’ अशी म्हणण्याची वेळ भाजपाप्रेमींवर आली आहे.

सांगली आणि जळगाव महापालिकेत विरोधकांना चारीमुंड्या चित करत भाजपाने मोठे यश संपादन केले. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे  जनतेने भाजपाला पर्याय म्हणून निवडून दिले. या निकालांचा येऊ घातलेल्या निवडणुकीवर निश्‍चित परिणाम होणार असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे. जिथे विरोधकांचे ‘होम ग्राउंड’ आहे तेथे पक्षाचे यश ऊर्जा देणारे आहे.  पिंपरी-चिंचवड शिहरवासियांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्‍न अधांतरीतच राहिल्याची भावना शहरवासियांत निर्माण होऊ लागली आहे. 

त्यातच भाजपाच्या महापौर निवडीमध्ये गटातटाच्या राजकारणाला मिळालेली पुष्टी, महापौर निवडीनंतर आनंदोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांकडून केलेली भंडार्‍याची मुक्त उधळण आणि त्यातून जायबंदी झालेले नागरिक, विकासकामांपेक्षा वरचढ ठरत असलेले शह-काटशहाचे राजकारण, राज्यभर सुरू असणारे मराठा आरक्षणाचे आंदोलनचा फटका पक्षाला बसत असल्याने त्याचे विरोधकांना आयतेच कोलित मिळत आहे. त्यातच भर म्हणून की काय पक्षातील नगरसेवकांमध्ये नसलेली एकवाक्यता, रखडलेल्या निवड-नियुक्त्या, त्यावरून सुरू असणारे ‘गॉसिप’ यामुळे पक्ष वाढीला खीळ बसत असल्याच्या भावना पक्षात व्यक्त होऊ लागल्या  आहेत. 

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य असेल वा विविध विषयाचे सभापतीपदे असेल ते गटा-तटात न विभागता तो भाजपाचा महापौर, स्थायी अध्यक्ष, सदस्य, सभापती ही एकवाक्यतेची भावना जोपर्यंत संबंधितामध्ये निर्माण होणार नाही आणि ‘व्यक्तीपेक्षा पक्षाला जोपर्यंत महत्व दिले जाणार नाही तोपर्यंत पक्षाची ‘इमेज’ मोठी होणार नाही, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात  आहे.  त्यामुळे  संबंधित पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांचे कान टोचण्यासाठी संबंधितांना वेळीच ‘शहाणपण देगा देवा’ अशी चर्चा भाजपा वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे.