Mon, Apr 22, 2019 03:40होमपेज › Pune › गॅसच्या वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती

गॅसच्या वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:54PMपिंपरी : प्रतिनिधी 

डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि डॉ. डी. वाय. पाटील ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी गॅस शेगडीतून वाया जाणार्‍या ऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्याचे उपकरण तयार केले. या उपकरणाचा फायदा देशभरातील नागरिकांना होणार आहे.

पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रावेत येथील केपीआयटी व डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलाजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल इनोव्हेशन स्पर्धेमध्ये भारतातून 12 हजार प्रकल्प आले होते. 

यामधून आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि डॉ. डी. वाय. पाटील ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थी आयुष अग्रवाल व गौरव धांडे, इशान कोकडवार, मार्गदर्शक डॉ. वंदना पाटील यांच्या टीमला दुसर्‍या क्रमांकाचे सिल्व्हर मेडल आणि अडीच लाख रुपयांचे पारितोषक मिळाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. राधाकृष्णन, ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष डॉ. एम. पीटर ऑडी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. अनेकदा गॅस शेगडीच्या बर्नलमधून अतिरिक्त ऊर्जा वाया जात असते. यासाठी विद्यार्थ्यांनी अ‍ॅल्युमिनिअमपासून हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे गॅसच्या वाया जाणार्‍या अतिरिक्त ऊर्जेचे रूपांतरण विजेमध्ये करण्यात आले आहे.

गॅस शेगडीवर ठेवण्यात येणार्‍या स्टँडऐवजी विद्यार्थ्यांनी बनविलेले हे उपकरण ठेवले असता उपकरणाच्या साह्याने ऊर्जेचे रूपांतरण विजेमध्ये होणार आहे. त्यामुळे गॅसची बचत होणार आहे. घरगुती गॅस जो तीस दिवस चालतो तो आणखी आठ किंवा दहा दिवस अधिक चालणार आहे. 

बनविलेले हे उपकरण कोणत्याही गॅस शेगडीवर चालणार आहे. यातून निर्माण होणार्‍या विजेची ऊर्जा ही गॅसवरील भांड्यास मिळणार आहे. ज्या ठिकणी वीज नाही तिथे हे उपकरण खूपच फायदेशीर आहे. हे उपकरण अतिशय स्वस्त आहे. यामध्ये डीसी पॉवर असल्यामुळे शॉक लागण्याचा धोका नसतो. यामध्ये सेमी कंडक्टर वापरले असल्यामुळे स्फोट होण्याचा धोका नाही.  - आयुष अग्रवाल (अभियांत्रिकी विद्यार्थी)