Sat, Jul 20, 2019 15:31होमपेज › Pune › ‘पोस्टमन’ना मिळालानवीन गणवेश

‘पोस्टमन’ना मिळालानवीन गणवेश

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

वर्षानुवर्षे टपाल विभागातील ‘पोस्टमन’ एकसारखाच वापरत असलेला गणवेश बदलण्यात आलेला आहे. त्यानुसार खादीला चालना देण्यासाठी सर्वच पोस्टमन पुरूष आणि महिलांना आता खादीचा गणवेश परिधान करावा लागणार आहे. या गणवेशासाठी आवश्यक असलेली पाच हजार रूपयांची रक्क्म संबंधितांच्या खात्यात नुकतीच वेतनाबरोबर अदा करण्यात आली आहे. त्यानुसार आता कर्मचार्‍यांना स्वत:च गणवेश शिवून घ्यावा लागणार आहेत.  

टपाल विभाग काळानुसार आधुनिक तंत्राचा वापर करू लागले आहे. मागील काही वर्षापासून या आधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे टपाल विभागात आमुलाग्र बदल झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला चालना देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टपाल विभागात कार्यरत असलेल्या सर्वच पोस्टमन पुरूष आणि महिला यांचा गणवेश खादीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लागलीच केंद्र शासनाच्या संचार मंत्रालयाचे मंत्री मनोज सिन्हा यांनी पुढाकार घेऊन पोस्टमन कर्मचार्‍यांच्या गणवेशात बदल केला. 

पोस्टमन पुरूष आणि महिला यांचा खादीच्या कापडापासून गणवेश कसा असावा याचे डिझाईन तयार करण्यासाठी नॅशनल इन्सिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे सहकार्य घेतले होते. त्यानुसार खादीचा गणवेश हा खाकी रंगाचाच असणार आहे. तर खिशावर आणि कॅपवर टपाल विभागाचा लोगो असणार आहे. तसेच शर्टाच्या खाद्यांवर आणि कॉलरवर लाल रंगाचे झालर असणार आहे. जुन्या गांधी टोपीऐवजी ‘कॅप’ देण्यात येणार आहे.

पुणे शहरातील टपाल विभागात कार्यरत असलेल्या पोस्टमन कर्मचार्‍यांना नवीन गणवेशाच्या शिवणावळीसाठी पाच हजार रूपयांचे अनुदान नुकतेच अदा केले आहे. प्रत्येकाने दोन गणवेश शिवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर बूट आणि सॉक्स वापरणे अनिवार्य आहे. पाच हजार रूपयात दोन गणवेश, बूट, सॉक्स नियमानुसार घेणे महत्वाचे आहे. तसेच गणवेश कसा शिवायचा याबाबत केंद्र शासनाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसारच शिऊन घ्यायचा आहे. मात्र हा गणवेश कधीपासून परीधान करावयाचा याबाबत केंद्र शासनाकडून अजून कोणतेही अधिकृत परिपत्रक आलेले नाही, अशी माहिती टपाल विभागाच्या पुणे कार्यालयातील सूत्रांनी दिली.