Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Pune › राज्यात गारपीट होण्याची शक्यता

राज्यात गारपीट होण्याची शक्यता

Published On: Feb 10 2018 1:54AM | Last Updated: Feb 10 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

सध्या मध्य प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर; तसेच कोकण, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका, उत्तरेकडील पंजाब, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. त्याचप्रमाणे मालदीवचा परिसर ते अरबी समुद्र आणि कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला असून, पुढील चार दिवस राज्यात वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यात दि. 11 आणि दि. 12 रोजी राज्यात गारपीट होणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 फेब्रुवारीला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर दि. 11 फेब्रुवारी रोजी विदर्भात गारपीट तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. 12 रोजी मात्र विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळी वार्‍याची तीव्रता 13 फेब्रुवारीला कमी होणार आहे, तर दि. 14 फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होणार आहे. राज्यात शुक्रवारी आकाश निरभ्र होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. शुक्रवारी नाशिक येथे 9.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

मागील 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) मुंबई 20.0, रत्नागिरी 19.7, भिरा 14.5, पुणे 10.8, अहमदनगर 10.6, जळगाव 12.2, कोल्हापूर 18.5, महाबळेश्वर 13.6,सांगली 17.7, सातारा 13.7, सोलापूर 17.8, उस्मानाबाद 13.4, औरंगाबाद 14.9, परभणी 14.0, नांदेड 14.0