होमपेज › Pune › तेल्या रोगाला बळी न पडणार्‍या डाळिंब जातीच्या चाचण्या सुरू

तेल्या रोगाला बळी न पडणार्‍या डाळिंब जातीच्या चाचण्या सुरू

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:59PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर शेतकर्‍यांनी घाबरून न जाता त्याला तत्काळ आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. तेल्या रोगाला बळी पडणार नाही, अशा डाळिंबाच्या जातीच्या चाचण्या घेण्याचे काम सध्या सुरू आहे. पुढील काही वर्षांत त्याच्या यशस्वी चाचण्यांनंतर शेतकर्‍यांना लागवडीस देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी दिली.

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या दोन दिवसांच्या वार्षिक अधिवशेनात त्या ‘डाळिंबमधील अजैविक ताण, समस्या आणि उपाय’ या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (एमपीकेव्ही) विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे हे होते. या वेळी व्यासपीठावर डॉ. नीलेश गायकवाड, एमपीकेव्हीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी व डॉ. किरण सूर्यवंशी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संघाच्या पदाधिकार्‍यांसह शेतकरीवर्ग उपस्थित होता. राज्यात तेल्या रोगाला बळी पडणार नाही अशी एकही डाळिंबाची जात सध्या नाही. एकाच जातीची लागवड असल्यास तेल्यासह अन्य जीवाणूंची बागेतील फळांवर झपाट्याने वाढ होते; तसेच शेतावर एकाच जातीच्या डाळिंबाची सलग लागवड करण्याऐवजी दोन जातींच्या लागवडीस प्राधान्य दिल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्या दृष्टीने शेतकर्‍यांनी नियोजन करण्यची गरज असल्याचेही डॉ. शर्मा म्हणाल्या.

डॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले की, आरोग्यदृष्ट्या डाळिंबाचे महत्त्व लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. तसे झाल्यास वाढत्या उत्पादनातून डाळिंब ज्यूस तयार करून त्याचे मार्केटिंग केल्यास सध्याच्या घटलेल्या बाजारभावाची चिंता भेडसावणार नाही आणि डाळिंबांचा खप वाढून शेतकर्‍यांना अधिक रक्कम मिळण्यास मदत होईल. इस्राईलमध्ये डाळिंब ज्यूसची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून आपल्याकडेही त्यास भरपूर वाव आहे.

अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. किरण कोकाटे म्हणाले की, डाळिंबाच्या काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. जागतिक बाजारातून भारतीय डाळिंबास चांगली मागणी आहे; त्यामुळे सध्या भाव पडले असले म्हणून शेतकर्‍यांनी खचून न जाता मालाचा दर्जा चांगला ठेवण्यावर अधिक भर द्यायला हवा. कारण निर्यात वाढायची असेल तर डाळिंबाच्या उत्तम प्रतीबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये.