Tue, Apr 23, 2019 10:11होमपेज › Pune › प्रदूषणाने पाण्यातील प्राणवायू घटला

प्रदूषणाने पाण्यातील प्राणवायू घटला

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:38PMपुणे : अपर्णा बडे

सांडपाणी, रासायनिक पाण्यावर प्रकिया न करताच नदीत सोडण्यात येणार्‍या दुषित पाण्यामुळे शहरातील मुठा नदीमध्ये ऑक्सिजनने शुन्याची पातळी गाठले आहे. या दुषित पाण्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेली पातळी ओलांडलेली आहे. परिणामी प्रदुषणावर जगणारी जलसृष्टी वाढत असून नदीला जलपर्णीने वेढले आहे. संतुलित पर्यावरणाचे प्रतिक असलेले पक्षी आणि जलचर या नदीतून नष्ट झाले आहेत. प्रदुषणामुळे नदीची तडफड सुरुच आहे.

मुठा नदीमध्ये दररोज सोडले जाणारे बहुतांश सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. मुठा नदीतील ऑक्सिजनच्या पातळीचा अभ्यास केल्यास विठ्ठलवाडी ते रेल्वे पुलापर्यंत वाहणार्‍या नदीतील ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान  महापालिकेच्या 2016-17  पर्यावरण अहवालानुसार महाराष्ट्र  प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा ऑक्सिजनचे प्रमाण कमी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ऑक्सिजनची पातळी शून्य असल्याने नदीतील जैवविविधता नष्ट झाल्याचे पर्यावरण अभ्यासक, पयार्र्वरणप्रेमींचे म्हणणे आहे.

एरंडवणे, म्हात्रे पूल, जोशी पूल, ओंकारेश्‍वर, रेल्वे पूल येथे ऑक्टोबर 2016 पासून बीओडीचे प्रमाण मंडळाने ठरवून दिलेल्या 30 मिलीग्रॅम प्रतिलीटर या पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीत जैविक प्रदुषकांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) अर्थात रासायनिक प्रदुषकांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. 

शहरात दररोज 744 दशलक्ष लीटर एवढे मैलापाणी प्रतिदिनी  तयार होते. मात्र पालिकेकडे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. पालिकेतर्फे सद्यस्थितीत 10 सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित असून त्यातून 567 दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते असा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात महापालिक्ने शहरात तयार होणार्‍या शंभर टक्के मैलापाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र महापालिका नदीच्या स्वच्छतेसाठी कागदांवर केवळ  कोट्यावधी रुपयांचे आराखडे तयार करित असून, प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलण्यास तयार नाही.

नदीचे वाढते प्रदुषण हा चितेंचा विषय आहे. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याने नदीतील जलचर मृत झालेले आहेतनदीतील वाढत्या प्रदुषणाबाबत योग्य त्या उपाय योजना न केल्यास शहरातील नदी ही लवकर मृत होण्याची भिती आहे.    -आरती म्हसकर, जीवित नदी कार्यकर्ते

नदीपात्रात थेट मैलापाणी मिसळले जात असल्याने नदी प्रदुषणात वाढ झाली आहे. शहरातील सर्व मैलापाणी प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास प्रदुषणास आळा बसेल.पालिकेकडून शहरातील एकूण 70 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याचा दावा केला जातो तो योग्य नसून केवळ 40 ट्क्के मैलापाण्यावर प्रकिया होते. अनेक ठिकाणी तर मैलापाण्यावर प्रक्रिया न करताच थेट ते पाणी नदीत सोडले जाते. शहरातील सांडपाण्यावर यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.    -गणेश कलापुरे, नदी स्वच्छता अभियान कार्यकर्ते