Sat, Aug 17, 2019 17:02होमपेज › Pune › विद्यापीठ अधिसभेसाठी अंदाजे ७० टक्के मतदान

विद्यापीठ अधिसभेसाठी अंदाजे ७० टक्के मतदान

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:55PMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेसाठी रविवारी मतदान पार पडले. विद्यापीठ अधिसभेच्या जागांसाठी अंदाजे 70 टक्के, तर प्राचार्यांच्या 6 जागांसाठी अंदाजे 90 टक्के मतदान झाल्याची माहिती विद्यापीठ निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. 

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळांसाठी रविवारी निवडणूक पार पडली. रविवारी शहरातील सर्व केंद्रांवर मतदानासाठी प्राध्यापकांच्या रांगा लागल्या होत्या. निवडणुकीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ आणि पुटा-स्फुक्टो संघटनेच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत असून, दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात आला.  निवडणूक मतदानात प्राचार्यांच्या 10 जागांपैकी 4 जागा बिनविरोध झाल्याने 6 जागांसाठी चुऱशीने मतदान झाले. अधिसभेच्या प्राचार्याच्या जागांसाठी 300 मतदार होते, त्यापैकी अंदाजे 90 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. 

त्याचबरोबर अधिसभेच्या इतर जागांसाठी अंदाजे 70 टक्के मतदान झाले आहे. विद्यापीठ प्राध्यापकांच्या 3 जागा, महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या 10, तर विद्या परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान पार पडले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील 45 केंद्रांवरील 102 बूथवर मतदान पार पडले. शहरातील 8 केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. निवडणुकीची मतमोजणी 23 जानेवारी रोजी होणार आहे. अधिसभेच्या निवडणुकीत 9 हजार 800 प्राध्यापक, तर 300 प्राचार्य मतदार होते.