Wed, Jan 16, 2019 11:21होमपेज › Pune › राजकारणाचा उपयोग लोकहितासाठी व्हावा 

राजकारणाचा उपयोग लोकहितासाठी व्हावा 

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:21AMपुणे : प्रतिनिधी 

लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या अग्रस्थानी जनतेच्या समस्या असायला हव्यात. राजकारणात काही अनिष्ट गोष्टी आहेत; परंतु याचा अर्थ राजकारण वाईट आहे, असा नव्हे. चांगले लोक राजकारणात आले, तर लोकशाही अधिक सक्षम होईल. राजकारण केवळ निवडणुका लढण्यासाठी किंवा सत्तेत येण्यासाठी करता कामा नये, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंग पाटील यांनी केले.

एमआयटी व भारतीय छात्र संसद फाउंंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी प्रतिभाताई पाटील बोलत होत्या. या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते. 

या वेळी प्रतिभाताई पाटील  या वेळी मुरलीमनोहर जोशी म्हणाले, जगभरात आपली ओळख युवकांचा देश म्हणून आहे.  युवकांमध्ये मोठी प्रतिभा असून, ती सत्यात उतरली तर देशात परिवर्तनाची लाट येईल. युवकांनी एकात्मतेची भावना जोपासून राजकारणात काम केले पाहिजे. 

या वेळी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. गौतम बापट आणि नीलम शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक आपटे यांनी आभार मानले. 

पटनायकांना ‘आदर्श मुख्यमंत्री’ पुरस्कार प्रदान

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ‘आदर्श मुख्यमंत्री’ पुरस्कार देऊन या वेळी  गौरविण्यात आले. सत्कारास उत्तर देताना  पटनायक म्हणाले की, राजकारणात येण्याचा 20 वर्षांपूर्वी विचारही केला नव्हता. लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी राजकारण महत्त्वाचे माध्यम आहे. राजकारणात नागरिक हा प्रथमस्थानी असायला हवा. गुड गव्हर्नस आणि नि:स्वार्थी लोकसेवा हेच शासनाचे आधारस्तंभ आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन बदलत असून, त्याला योग्य नियोजन आणि चांगल्या सोयीसुविधांची गरज आहे. लोकांवर प्रेम केले, तुम्ही लोकांमध्ये राहिलात, तर लोक तुमच्यावर विश्‍वास टाकतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पटनायक यांनी या वेळी केले.