Sat, Apr 20, 2019 10:31होमपेज › Pune › लगीनघाईत सोपस्कार राजकियांचे अन् खापर मात्र निवेदकांवर 

लगीनघाईत सोपस्कार राजकियांचे अन् खापर मात्र निवेदकांवर 

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 10:49PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

सध्या सर्वत्र सुरु असलेल्या लग्नसोहळ्यांमध्ये उपस्थित राहणार्‍या राजकीय पुढार्‍यांचे शाद्बिक स्वागत, सन्मान असे सोपस्कार पूर्ण करताना दोन तास घसा ताणणार्‍या निवेदकांवर मात्र खापर फोडले जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.मावळ तालुक्यात लगीनसराई अतिशय जोमात सुरु असून टिळा, मांडव टहाळा, साखरपुडा, शुभविवाह सोहळा, स्वागतसमारंभ अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल म्हणजे लोकांशी संपर्क साधण्याचे उत्तम साधन असे समीकरण असल्याने बहुतांश राजकीय पुढारी सबंधीत कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. 

या राजकीय पुढार्‍यांचे सर्व पदांसह शाद्बिक स्वागत करण्याची जबाबदारी निवेदकांवर असते. त्यांच्या हस्ते दोन्ही परिवाराच्या जावयांचा सन्मान, मध्यस्थीचा सन्मान, नवरदेवाचा सन्मान, एखादे वाहन असेल तर त्या वाहनाची चावी प्रदान आणि शेवटी उपस्थितांचे प्रातिनिधीक स्वरुपात स्वागत व वधू-वरांना आशिर्वाद हे सोपस्कार पूर्ण केले जातात. सुमारे दिड ते दोन तास तोंडाला फेस येईपर्यंत सर्वांचे स्वागत करताकरता हा सन्मानाचा ताळेबंदही निवेदकांनाच करावा लागतो. अशा परिस्थितीत सर्वांना संधी देणे हे त्या निवेदकाचे मोठे कौशल्य असते. याशिवाय, स्वागत व आशिर्वादाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची हेही ठरवायचे असते. 

निवेदक आपल्या अनुभवातून हे सोपस्कार पूर्णही करतात, परंतु, यामध्येही काहीवेळा निवेदकाच्या शेजारील कार्यकर्ते ऐनवेळी बदल करतात आणि सन्मानाच्या यादीतील मान्यवरांच्या नावांमध्ये फेरबदल करतात. हा प्रकार स्वत:च्या सबंधातून किंवा राजकीय द्वेषातून केला जातो पण याचे खापर मात्र निवेदकावर फुटते. तोंडाला फेस येईपर्यंत बोलत राहणार्‍या निवेदकाकडून एखाद्या नेत्याचे अथवा कार्यकर्त्याचे नाव राहिले किंवा एकाच पदाच उल्लेख झाला कि लगेच सबंधीत व्यक्ती निवेदकाचा घाम काढतात. अशा वेळी सबंधीत व्यक्तीचे यापूर्वी किती लग्नांमध्ये त्याचे नाव त्याच निवेदकाने घेतलेले असते याचा पुसटचा विचारही करत नाही.

सन्मान तर सोडाच्, पण साधा नामोल्लेखही नाही !

दरम्यान, मावळ तालुक्यात निवेदक म्हणून भुमिका बजावणारे अनेकजण कुठलाही मोबदला न घेता निवदक म्हणून काम करत आहेत. तोंडाला फेस येईपर्यंत सर्वांचे स्वागत करण्याची जबाबदारी पार पाडणार्‍या निवेदकाचा सन्मान तर नाहीच पण स्वागत, आशिर्वाद देणारे मान्यवर ‘संयोजकांनी आपले स्वागत केलेच आहे‘ असा एकेरी उल्लेख करुन निवदेकाच्या नावाचा उल्लेख करणेही जाणीवपूर्वक टाळताना दिसतात.