Thu, Jun 20, 2019 02:04होमपेज › Pune › शहर काँग्रेसमध्ये रंगलेय शह-काटशहाचे राजकारण

शहर काँग्रेसमध्ये रंगलेय शह-काटशहाचे राजकारण

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 11:40PMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीवरून शहर काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. शहराचे पदाधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकारी यांच्यात स्थायी सदस्यपदी नेमणुकीवर कुरघोड्या सुरू असून, त्यासंबंधीच्या तक्रारी थेट प्रदेश पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत.

शहर काँग्रेसमधील गटबाजी नेहमीचाच विषय आहे. मात्र, गेले काही महिने पक्षात शांततेचे वातावरण होते. सद्यःस्थितीलाही पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र आहे; मात्र हे चित्र वरवरचे असून, सध्या कुरघोड्यांचे राजकारण जोरात आहे. या राजकारणाला निमित्त ठरले आहे ते स्थायी समिती सदस्य निवडीचे. महापालिकेच्या स्थायी समितीमधून लॉटरी पध्दतीत काँग्रेसचे एकमेव सदस्य असलेले अविनाश बागवे बाहेर पडले. त्यांच्या जागी नव्याने नियुक्त करायच्या एका जागेसाठी अविनाश बागवे यांच्यासह लता राजगुरू, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे अशा काही इच्छुकांचा समावेश होता. त्यात पक्षाने नगरसेविका वैशाली मराठे यांना संधी दिली. मात्र, या निवड प्रक्रियेत पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी जातीचे राजकारण केल्याच्या तक्रारी शहर पातळीवरील काही पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केल्या.  प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शिंदे यांना बोलावून घेऊन यासंदर्भात विचारणा केली.

त्या वेळी शिंदे यांनी स्थायी समिती सदस्याची निवड कशा पध्दतीने केली, याचा खुलासा करून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर चव्हाण यांचे समाधान झाल्यानंतर शिंदे यांनी तक्रार करणार्‍यांनी केलेल्या कारनाम्यांचा पाढाच प्रदेशाध्यक्षांसमोर मांडला. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या लक्षात वस्तुस्थिती आली, त्यामुळे स्थायी समितीच्या निवडीच्या तक्रारीवर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाद मिटला असल्याचा हा केवळ देखावा असून, भविष्यकाळात हा वाद उफाळून चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.