Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Pune › पिंपरी मतदारसंघात राजकीय धुळवड रंगणार?

पिंपरी मतदारसंघात राजकीय धुळवड रंगणार?

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 1:18AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे  शिवसेनेशी आपले नाते सांगू लागल्याने त्या विधानसभेला पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेतर्फे लढण्याची चाचपणी तर  करत नाहीत ना, असा प्रश्न सर्वांना पडला असतानाच, सावळे यांचे सेनेतील विरोधक खा. श्रीरंग बारणे यांनी आज राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा मातोश्रीवर सेनेत प्रवेश घडवून आणला. ननावरे यांचे नाव विधानसभेसाठी पुढे आणण्याची खा. बारणे यांची ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पिंपरी विधनसभा मतदारसंघात राजकीय धुळवड चांगलीच रंगणार आहे.

सावळे या सेनेत असताना माजी खा. गजानन बाबर यांच्या समर्थक मानल्या जात. लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने बाबर यांनी शिवबंधन तोडले व शेकापच्या तिकिटावर व मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या लक्ष्मण जगताप यांची त्यांनी पाठराखण केली. सेनेने त्या वेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सावळे यांची तोंडी हकालपट्टी केली. विधानसभेला जगताप यांनी भाजपची वाट धरली. त्याच सुमारास सावळे यांनी पिंपरीतून सेनेतर्फे चाचपणी केली; मात्र सेनेचे खा. श्रीरंग बारणे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी माजी उपमहापौर गौतम चाबुकस्वार यांना सेनेची उमेदवारी देण्याची खेळी केल्याने सावळे यांनी शांत बसणे पसंत केले  पालिका निवडणुकीत सावळे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या व स्थायी समितीच्या अध्यक्षही झाल्या. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी त्या तीव्र इच्छुक आहेत. ‘स्थायी’च्या सभेत पालिकेत समाविष्ट गावांसाठी 425 कोटींच्या   कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी व सेनेने केला. भाजप खा. अमर साबळे यांनीही याप्रकरणी चौकशीची मागणी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती अध्यक्षा  सावळे यांनी साबळेंवर तोफ डागली. पालिकेच्या सभेत 425 कोटींच्या कामावरून विरोधकांनी भाजपला घेरले तेव्हा सावळे यांनी त्यास आक्रमक उत्तर दिले. सेनेत असताना केलेली आंदोलने, शिवसेनाप्रमुखांवरील श्रद्धेमुळे पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावण्याचा अमलात आणलेला निर्णय  याची आठवण त्यांनी करून दिली. सेनेत काल-परवा आलेल्यांना चिमटेही घेतले. नव्याने समाविष्ट गावांतील 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना कामांमध्ये ‘रिंग’ झाली म्हणून बोंब ठोकण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रिंग झाली असल्याचा आरोप  त्यांनी केला.

एकीकडे अजित पवार हे शिवसेनेच्या वाघाची शेळी, शेळीचा ससा आणि  सशाचे  कासव झाल्याची टीका करतात, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वाघ, ससा काही असो; पण आम्ही धरणात लघुशंका करत नाही, असे उत्तर देतात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र शिवसेना राष्ट्रवादीसोबत गुफ्तगू करत आहे. शिवसेना इतकी लाचार कधीच नव्हती. आम्ही सेनेत असताना सभागृहात संख्येने खूप कमी होतो; पण राष्ट्रवादीचा घाम काढला होता. आता सेना आणि राष्ट्रवादीत राजकीय ‘रिंग’ झाली असल्याची टीका त्यांनी केली.

सावळे या सेनेशी नाते सांगू लागल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. सावळे याचे शिवसेना नेत्यांशी आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे त्या विधानसभेला सेनेतर्फे लढणार का याबाबत चर्चा सुरू झाली. सावळे यांचे नाव पिंपरीत सेनेच्या उमेदवार म्हणून पुढे येण्याची चिन्हे दिसल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी खेळी करत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घडवून आणला. पिंपरीत सध्या गौतम चाबुकस्वार सेनेचे आमदार आहेत. त्यांच्यावर शिवसैनिकांमध्ये असलेल्या नाराजीमुळे सावळेंचे नाव पुढे येऊ शकते हे लक्षात घेऊन खा. बारणे यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.