Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Pune › फावडे घेऊन हवालदार उतरले रस्त्यावर 

फावडे घेऊन हवालदार उतरले रस्त्यावर 

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:02PMपवनानगर : काले-पवनानगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गावांतील रस्त्यांवर पाणी साचलेले असून, येथून ये-जा करणे ग्रामस्थांना गैरसोयीचे ठरत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण होते. पवनानगर-महागांव रस्त्यावर पोलिस चौकीजवळही पाणी साचले होते; परंतु ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे पोलिस हवालदार राकेश पालांडे यांनी पुढाकार घेऊन स्वत:  टिकाव-फावडे हातात घेऊन गटार काढून साचलेले पाण्यास मार्ग काढून तो रस्ता खुला केला. पवना विद्या मंदिरातील विद्यार्थी, स्थानिकंनी श्रमदान करून रस्त्याच्या बाजुने गटार काढून पाणी काढण्यासाठी पुढाकार घेतला. पवनानगर ही परिसरातील 40 गावे वाड्यावस्त्यांची बाजारपेठ तसेच बँका, शाळा, महाविद्यालय यांचबरोबर  शासकीय  कार्यालय याच बाजारपेठेत असल्याने येथे कायम गर्दी असते. 

पवनानगर- महागाव रोडच्या रस्त्यालगतची दुकानांची बांधकामे झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर साचून राहते. पावसाचा जोर वाढला की, या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो.  वाहनचालक पाण्यातून जोरात गाडी घेऊन जातात, त्यामुळे पादचार्‍यांच्या अंगावर पाणी उडल्याने अनेकदा वादाच्याघटना घडतात.  याबाबत अनेकांनी ग्रामपंचायत व पाटबंधारे विभागाकडे येथे गटार व्यवस्था करण्यात यावी याची मागणी केली आहे. मात्र पाटबंधारे व ग्रामपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे.  शेवटी पोलिसांनी यात लक्ष घालून हा रस्त्यावरच्या पाण्यास वाट दिली.  या वेळी पोलिस हवालदार राकेश पालांडे, सुनील गवारी, पोलिस पाटील सीमा यादव, भारत काळे, गणपत कालेकर, बजरंग घारे, पवना विद्या मंदिराचे विद्यार्थी उपस्थित होते.