होमपेज › Pune › पोलिसाला गोळ्या घालण्याची धमकी

पोलिसाला गोळ्या घालण्याची धमकी

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी  

भांडणाच्या प्रकाराबद्दल माहिती घेण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याला धक्‍काबुक्‍की करून गोळ्या घालण्याची धमकी देणार्‍या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. दोघांनाही 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उमेश सूर्यकांत साखरे (28, रा. साखरे वस्ती, हिंजवडी, मुळशी) आणि शरद तुकाराम हुलावळे (29, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी, ता. मुळशी) अशी पोलिस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई मोहन गोविंद दळवी (29) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला हिंजवडी येथील हॉटेल सनराईज समोर भांडणाचा प्रकार सुरू असल्याचा कॉल आला. फिर्यादी मोहन दळवी हे त्यावेळी रात्रपाळी

ड्युटीस असताना कॉल प्राप्त झाल्यानंतर ते घटनास्थळी गेले. तेथे गेल्यानंतर उमेश साखरे याने दळवी यांना तू येथे कशाला आला आहेस, पोलिसांचे येथे काय काम आहे, असे म्हणत त्यांना निघून जा, नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. तर शरद हुलावळेने  दळवी यांना धक्‍काबुक्‍की करून ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांनी दारू पिली होती असेही पोलिसांचे म्हणणे आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, उमेशकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नाही. परंतु, त्याने गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याने त्याच्याकडे कोणते बेकायदेशीर शस्त्र आहे का ? याचाही तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी दोघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

Tags :Pune, Police, threatens,  fire