Fri, Jul 19, 2019 01:13होमपेज › Pune › आंतरराज्य ‘खुजली गँग’ जाळ्यात

आंतरराज्य ‘खुजली गँग’ जाळ्यात

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी

अंगावर खुजली पावडर, घाण टाकून रोकड लुटणार्‍या आंतरराज्य टोळीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले असून, मुंढवा पोलिसांनी दोन टोळ्यांमधील तब्बल 14 जणांना अटक केली आहे. त्यांनी पुण्यात 9, ठाण्यात 3 गुन्हे केले असून या आरोपींकडून सात मोटारसायकली, 14 मोबाईल, कोयता, चॉपर, लोखंडी धातूच्या गोळ्या, खुजली पावडर, पारले बिस्किटे असा एकूण चार लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ परिसरातही गुन्हे केले आहेत.

चल्ला सनी येलीया सल्ला (वय 26), राजेश जेमीस गोगुला (वय 23), संतोष देवरकोंडा रामलुर (वय 36), राकेश दावित आवला (वय 19), येशेबु जानू गोगला (वय 52), शिवकुमार रविबाबू पिटला (वय 36), उतलज सुबलू आवला (वय 40), सुभार रवी बानाळू (वय 29), व्हिक्टर रवीबाबू पिटला (वय 30), आमुस तिपय्या आवला (वय 32), माधव सुंदरम गोगला (वय 37), चिन्ना बाबू कुनचाल्ला (वय 29), विजयकुमार शेखर रेड्डी (वय 26) आणि सॅम्युअल रा तिमोती राज (वय 25, सर्व रा. बिटरगुंटा, ता. कवली आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना अंगावर खुजली पावडर, घाण, वाहनांजवळ नोटा टाकणे, वाहनाची काच फोडणे, टायर पक्चंर करणे, डिक्की फोडणे अशा पद्धतीने दररोज गुन्हे सुरू होते. त्यामुळे परिमंडळ चारचे उपायुक्क्त दीपक साकोर यांनी एक विशेष तपास पथक तयार केले होते. त्यावेळी मुंढवा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल गवळी यांना मिळालेल्या माहितीवरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना 14 जणांस ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास करताना ही लुटमार करणारी टोळी असल्याचे समोर आले. या टोळीकडे कसून तपास केला असता त्यांनी दोन महिन्यात पुण्यात खुजली पावडर, घाण टाकून व इतर पद्धतीने गुन्हे करत असल्याचे समोर आले.

या गुन्ह्यातील चिन्ना कुनचाल्ला व माधव गोगला यांच्या दोन वेगवगेळ्या टोळ्या आहेत. ते एकाच गावातील असून एखादा मोठा गुन्हा करायचा असेल तर एकत्र येऊन गुन्हे करत होते. या आरोपींनी बी. टी. कवडे रोडवर अंगावर खुलजी पावडर टाकून 4 लाखाची रोकड लुटल्याचे समोर आले आहे. तसेच, मुंढवा, वानवडी, विमानतळ, भोसरी एमआयडीसी, पुणे ग्रामीण, ठाणे शहर, ग्रामीण, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे अशा पद्धतीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर, उपनिरीक्षक गवळी, कर्मचारी सोनवणे, चव्हाण, जगताप, गायकवाड, शिंदे यांच्या पथकाने केली.