Fri, Mar 22, 2019 06:12
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पोलिस चौक्या समस्यांच्या गर्तेत

पोलिस चौक्या समस्यांच्या गर्तेत

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 20 2018 11:03PMपिंपरी : अमोल येलमार

‘स्मार्ट सिटी’तील ‘स्मार्ट पोलिसिंग आणि टेक्नोसॅव्ही’ बनण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या पुणे पोलिसांच्या मूलभूत समस्याच सुटत नाहीत. पोलिस ठाणे, चौक्यांमधील अस्वच्छता, परिसरात वाढलेले गवत, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, महिला कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा अभाव, प्यायला पाणी नसणे, बसायला जागा नसणे यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रासले असून, याकडे वरिष्ठांकडून जाणूनबुजून कानाडोळा केला जात आहे.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीनच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड शहरात आठ पोलिस ठाणी आहेत. त्याअंतर्गत 27 पोलिस चौक्या आहेत. यांतील बहुतांश ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हिंजवडी, वाकड आणि नुकतेच उद्घाटन झालेली एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याची इमारत सोडल्यास सर्वच पोलिस ठाण्यांच्या आसपासचा परिसरात डास, दुर्गंधी, दमटपणा पसरलेला आहे. यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भोसरी व पिंपरी पोलिस ठाण्याला लागून पोलिसांची वसाहत आहे; मात्र येथील चिखल, साठणारे पाणी, गटारे, वाढलेले गवत यामुळे रहिवासांमध्ये आजारपण वाढले आहे. वाकड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र-प्रशस्त इमारत बांधल्याने सध्या तरी या ठिकाणी कोणत्याही मूलभूत समस्या नसल्याचे कर्मचारी सांगतात; मात्र वाकड पोलिस ठाण्यांतर्गत येणारी काळेवाडी पोलिस चौकी आजही एका दुकानाच्या जागेत आहे. या ठिकाणी तीन-चार अधिकारी, कर्मचारी सोडले, तर एकही मनुष्य थांबू शकत नाही. चौकीसमोर एखादे वाहनही व्यवस्थित उभे  करता येत नाही. या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही.

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याला नुकतीच नवीन इमारत मिळाली; मात्र या पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या लांडेवाडी चौकीत अत्यंत घाणीचे साम्राज्य आहे. येथील स्वच्छतागृहाची दुर्गंधी, सांडपाण्याच्या नाल्याची दुर्गंधी, वाढलेले गवत, अपुरा उजेड यामुळे येथे अधिकारी-कर्मचार्‍यांना बसणे देखील मुश्कील झाले आहे. अनेक चौक्यांचे छत गळत असून, त्याकडे कोणत्याच अधिकार्‍याचे लक्ष नाही. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुदळवाडी चौकीचीही अवस्था बिकट आहे. याही ठिकाणी अधिकारी-कर्मचार्‍यांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. सांगवी पोलिस ठाण्याचीही बिकट अवस्था आहे. पोलिस ठाणे सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते गाळ्यामध्येच सुरू आहे. पोलिस ठाण्याचीच ही अवस्था असेल, तर मग चौक्यांची काय परिस्थिती असेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. जुनी सांगवी पोलिस चौकीचीही बिकट अवस्था आहे.

शहरातील मोजक्या पोलिस ठाण्यांतच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. सांगवी पोलिस ठाणे, तर प्रस्तावित भाजी मंडईच्या गाळ्यामध्ये चालते. शहराला महिला पोलिस आयुक्त असताना एवढी दयनीय अवस्था महिला कर्मचारी-अधिकार्‍यांची होत असेल, तर ‘हक ना बोंब’ अशी स्थिती सध्या शहरातील महिला पोलिसांची झाली आहे. त्याच बरोबर वाहतूक पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलांना तर स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम हा प्रकार अस्तित्वात असतो का असा प्रश्न पडतो; कारण कोणत्याच महिला वाहतूक पोलिसाला कुठेच या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. आतापर्यंत वाहतूक विभागाच्या प्रमुख पदी अनेक उपायुक्तांनी काम केले; मात्र त्यातील एकानेही महिला वाहतूक पोलिसांच्या या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही.

अधिकार्‍यांच्या केबिन बघण्याजोग्या

वरिष्ठ निरीक्षक असो वा त्यावरील उच्चपदस्य अधिकारी अपवादाने एखाद्या चौकीत जाऊन बसतात. निरीक्षकांपासून उपायुक्तांपर्यंत सर्वांचीच केबिन आणि अँटीचेंबर हे एसी आणि टापटीप असल्याने या अधिकार्‍यांना कर्मचारी आणि ज्युनिअर ऑफिसर बसणार्‍या चौक्यांबाबत काहीच सोयरसुतक नाही. 

‘पीडब्ल्यूडी’ विभागाचे दुर्लक्ष

शासकीय इमारत देखभाल-दुरुस्तीचे काम पीडब्ल्यूडी विभागाकडे असते. अनेक ठिकाणच्या दुरुस्तीसाठी पोलिस अधिकारी पत्रव्यवहार करतात; मात्र ही पत्रे महिनोन्महिने धूळखात पडून असतात. त्यामुळे पत्र देणारेही काही दिवसांनी आपण दिलेले पत्र विसरून जातात. पीडब्ल्यूडी विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेही समस्या वाढत आहेत.

जप्त वाहनांची भर

वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येक पोलिस ठाणे, चौकीच्या परिसरात वाहने आणलेली असतात;  मात्र ही वाहने वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी पडून राहतात. यामुळे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरते. यातून रोगराई वाढते.