Thu, Apr 25, 2019 12:13होमपेज › Pune › पोलिसांच्या चोख नियोजनामुळे ‘बंद’ शांततेत

पोलिसांच्या चोख नियोजनामुळे ‘बंद’ शांततेत

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 10 2018 12:59AMपिंपरी : प्रातिनिधी 

आरक्षण तसेच विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद शांततेत पार पडला.पिंपरी चिंचवडकरांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलिसांनी चाकणची पुनरावृत्ती होऊन नये यासाठी यावेळी विशेष खबरदारी घेतली होती. शहाराबाहेरील काही किरकोळ घटना वगळता बंदला कुठेही गालबोट लागले नाही. 

पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी बंदचे चोख नियोजन केले होते. शहरातील प्रत्येक चौकात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ‘रॅली’ आणि ठिय्या आंदोलनावर देखील पोलिसांची करडी नजर होती. चाकणमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला असल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले होते. 

सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. पोलिसांचे विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आले होते. पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आंदोलनाचे केंद्रस्थान असल्याने चौकाच्या चारही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुन्हे शाखेलाही बंदोबस्तात सामील करून घेण्यात आले होते. दंगा काबू नियंत्रण पथक, राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, होमगार्ड, स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी असा एक हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात होता.

या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार दिवसांपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरवात केली होती. अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या. तसेच संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले असल्याने आंदोलनकर्त्यांनी संयमाची भूमिका घेतली होती. 

बावधनमध्ये सौम्य लाठीचार्ज 

एकीकडे आंदोलन शांततेत सुरु असताना निगडी यमुनानगर येथे काही आंदोलकांनी महापालिकेच्या वाहनावर दगडफेक केली. बावधन येथे आक्रमक जमावाने पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.