Sun, Aug 18, 2019 20:48होमपेज › Pune › पोलिस कर्मचार्‍याची पत्नीच ठरली थर्डडिग्रीची शिकार; पोलिसी बेल्टने चार तास बदडले!

पोलिस कर्मचार्‍याची पत्नीच ठरली थर्डडिग्रीची शिकार

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:54AMपुणे : अक्षय फाटक

पोलिस ‘थर्डडिग्री’चा वापर पूर्वी अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करत. परंतु, अलीकडे मानवाधिकार आयोगाचा बडगा व कायद्याच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने गुन्हेगारांवरही ‘थर्डडिग्री’चा वापर करताना पोलिस कचरतात. मात्र, पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत कर्मचार्‍याने मद्यधुंद अवस्थेत 28 वर्षीय पत्नीला पोलिसी बेल्टने चार तास अमानुषपणे मारहाण केली. 
मारहाणीनंतर गळफास घेण्यासाठी जबरदस्ती केली. खुद्द पोलिस कर्मचार्‍याचीच पत्नी  ‘थर्डडिग्री’ची शिकार ठरली.  या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या दाम्पत्याचा आठ वषार्र्ंपूर्वी प्रेमविवाह झालेला असून, त्यांना एक चार वर्षांचा मुलगा आहे. संबंधित कर्मचार्‍याला दारूचे व्यसन असून, तो नशेत चारित्र्याच्या संशयावरून नेहमी पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असे. 27 एप्रिल रोजी पहाटे त्याने पत्नीला झोपेतून उठवून बेल्टने मारहाण केली. त्यानंतर सकाळी पत्नीच्या भावाला घरी बोलावून त्याच्यासोबत पत्नीला माहेरी पाठवले. लगोलग तोही पोलिस गणवेशात पत्नीच्या पाठीमागे तिच्या आई-वडिलांच्या घरी गेला. त्याठिकाणीही शिवीगाळ करीत गोंधळ घातला. मुलाला जबरदस्तीने घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.  सासर्‍याने मुलाला घेऊन जाऊ न दिल्याने रागाने तो निघून गेला. याच दिवशी पत्नीला फोन करून मुलाची शपथ घेऊन पुन्हा मारहाण करणार नाही, असे म्हणत घरी परतण्याची विनंती केली. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून त्याच दिवशी रात्री 12 वाजेच्या सुमारास पत्नी घरी परतली. 

काही दिवस तो पत्नीशी चांगला वागला. परंतु शुक्रवारी दुपारी (दि. 5) त्याने दारू ढोसली आणि पत्नीशी किरकोळ कारणावरून वाद घातला.  दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास चार तास त्याने पोलिसी बेल्टने तिला जबर मारहाण केली. एवढेच नाही तर चाकू काढून हातावर वार केले.  गोळ्या घालून तुला मारून टाकेन, अशी धमकी दिली.  त्यानंतर दोन तास झोपला आणि पुन्हा रात्री 10 वाजता पत्नीशी वाद घालत तिला मारहाण केली. कहर म्हणजे, ओढणी हातात देऊन गळफास घेण्यासाठी जबरदस्ती सुरू केली. यावेळी पतीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पत्नीने आरडा-ओरड सुरू केली. हा आवाज ऐकून शेजारी राहणार्‍या नातेवाईकांनी घरी धाव घेऊन तिची सुटका केली.  त्यानंतर मध्यरात्री पत्नी माहेरी निघून गेली व दुसर्‍या दिवशी दत्तवाडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.  दरम्यान, मारहाण केल्यानंतर कर्मचारी संबंधित दत्तवाडी पोलिस ठाण्यात कामावर आलेला नाही, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

आत्महत्या करत असल्याचे लिहून घेतले

संबंधित कर्मचार्‍याने दि. 27 एप्रिल रोजी पत्नीला बेल्टने मारहाण करीत जबरदस्तीने कोर्‍या कागदावर आत्महत्या करत असल्याचे तिच्याकडून लिहून घेतले. मात्र, सुसाईड नोट लिहीत असताना पत्नीचा भाऊ घरी आला. त्यामुळे  सुसाईड नोट अर्धी लिहिली गेल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.