Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Pune › पुण्यात 'अर्थपूर्ण' हायप्रोफाईल एस्कॉर्ट तेजीत!

पुण्यात 'अर्थपूर्ण' हायप्रोफाईल एस्कॉर्ट तेजीत!

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 1:58AMपुणे : देवेंद्र जैन

पुणे शहरात अलीकडे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि ऑनलाईन एस्कॉर्ट जाहिरातीच्या माध्यमातून हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय तेजीत सुरू आहे. आता तर या व्यवसायामध्ये परदेशी महिलांचा वापर वाढत आहे.  काही मोजक्या टोळ्यांकडून शहरात हा व्यवसाय चालविला जात असून, महिन्याला कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे. या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी शहर गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये खास पथक असूनदेखील त्यांच्याकडून व स्थानिक पोलिसांकडून ‘अर्थपूर्ण’ गोष्टींमुळे दुर्लक्ष केले जात आहे; त्यामुळे या टोळ्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही.

पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असून, महत्त्वाचे माहिती तंत्रज्ञान केंद्र, शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. या ठिकाणी नोकरी करणार्‍यांची मोठी संख्या आहे. तसेच, शिक्षणासाठीही अनेक विद्यार्थी या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यावर वेश्या व्यवसायातील टोळ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पुणे शहरात कल्याणी देशपांडे, अजय पाटील, भरत कोल्हापुरे अशा अनेक टोळ्यांकडून मुख्यत्वेकरून हा व्यवसाय चालविला जातो. कल्याणी देशपांडे या येरवडा कारागृहात मोक्‍का कायद्यांतर्गत आहेत. प्रत्येक टोळीकडे साधारण पाच ते दहा मोटारी असून, त्याच्यामधून ग्राहकांना तरुणी पुरविल्या जातात. या टोळ्यांकडे साधारण दोनशे ते अडीचशे तरुणी असून, त्यांच्यामार्फत वेश्या व्यवसाय करून घेतला जातो.
पोलिसांनी टाकलेल्या काही धाडींमध्ये अनेक परदेशी महिलांना यातून सोडवण्यात आले आहे. शहरातील अनेक तारांकित हॉटेल्समध्ये नेहमीच्या ग्राहकांसाठी खास सोयी पुरवल्या जात असल्याची माहिती  सूत्रांकडून देण्यात आली. काही वेळेस या तरुणींना ठरावीक रक्कम देऊन दहा-वीस दिवसांच्या करारावर वेश्या व्यवसायासाठी बाहेरच्या देशातून किंवा राज्यातून बोलविले जाते. परदेशी महिला या पर्यटक व्हिसावर आपल्या देशात येतात व काही वेळेस त्या नेपाळमार्गे भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करतात.

पुण्यात या टोळ्यांकडून वेश्या व्यवसायासाठी अत्याधुनिक तंत्राज्ञानाचा वापर वाढला असल्याचे दिसून येते. मुख्यत्वे सोशल मीडियाचा वापर होत आहे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ऑनलाईन एस्कॉर्टच्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहक शोधले जातात. व्हॉट्अअ‍ॅपवरून ग्राहकाला थेट तरुणींचे फोटो आणि त्यांचा दर पाठविला जातो. त्यानुसार ग्राहकाने निवड केलेली तरुणी त्याने सांगितलेल्या ठिकाणी पाठविली जाते. त्यासाठी या टोळ्यांकडून तरुणी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते; तसेच ऑनलाईन एस्कॉर्टच्या जाहिरातीवरून त्यांना ग्राहक मिळतात. त्यांच्या मागणीनुसार मोटारीतून त्यांना तरुणी पुरविल्या जातात. तसेच, फेसबुकवरूनदेखील मोठ्या प्रमाणात ग्राहक शोधले जातात. पुण्यात मुख्यत्वेकरून कोरेगाव पार्क, विमाननगर, खराडी, हिंजवडी परिसरात हा व्यवसाय तेजीत सुरू आहे/.

 या ठिकाणी असलेले उच्चभ्रू ग्राहक हे या व्यवसायातील व्यक्तींचे लक्ष्य असतात; तर कात्रज भागातही वेश्या व्यवसाय सुरू असून, या ठिकाणी विद्यार्थी व आर्थिक दर्जा कमी असलेले ग्राहक त्यांना मिळतात. या व्यवसायाचे लोण आता ग्रामीण भागात पसरले आहे. लोणावळा, चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे परिसरातदेखील हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. यावर नजर ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडे अजून विशेष पथक नाही; पण शहर गुन्हे अन्वेषण विभागामध्ये खास सामाजिक सुरक्षा विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागाला कुंटणखान्यातील वेश्या व्यवसाय दिसतो; मात्र हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाकडे ‘अर्थपूर्ण’ गोष्टीमुळे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. या टोळ्यांकडून सर्वच ठिकाणी हात ओले केले जात असल्यामुळे त्यांना कारवाईची भीती राहत नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.